मुंबई : अनधिकृत झोपडीच्या वादातून आरे येथे स्थानिक गुंडाने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून शनिवारी रात्री ही घटना घडली. दोन गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. हल्ला करणारा कुख्यात गुंड जोहराद्दून उर्फ बडा कालू देखील या प्रकारात गंभीर जखमी झाला आहे.

गोरेगावच्या आरे कॉलनी युनिट ३२ येथे हा परिसर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहे. अशीच एक अनधिकृत झोपडी बांधण्याच्या वादातून स्थानिक गुंड जोहराद्दून उर्फ बडा कालू आणि फूरखान यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. जोहराद्दून याने धारदार शस्त्राने फूरखान याच्यावर हल्ला केला. त्यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच आरे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या हल्ल्यात फूरखान याचा मृत्यू झाला तर हल्ला करणारा जोहराद्दून उर्फ बडा कालू हा जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आरे पोलिसांनी याप्रकरणी जोहराद्दून उर्फ बडा कालू, त्याचा भाऊ अझरूद्दीन, आई रझिया, वहिनी आफरीन यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. रझिया आणि आफरिन यांना अटक करण्यात आली आहे तर अझरूद्दीन फरार आहे. रुग्णालयातून सुटल्यानंतर जोहराद्दून याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. गुन्हा घडल्याच्या अवघ्या तासाभरात आरोपींना अटक करण्यात आली. परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण, उपनिरीक्षक संपत घुगे, सचिन पांचाळ आणि त्यांच्या पथकाने याप्रकरणी कारवाई करून आरोपींना अटक केली.

कोण आहे गुंड जोहराद्दून उर्फ बडा कालू?

जोहराद्दून उर्फ बडा कालू हा युनिट ३२ परिसरातील कुख्यात गुंड आहे. याबाबत माहिती देतांना आरे पोलिसांनी सांगितले की, अनधिकृत झोपड्या बांधून त्या विकण्याचे काम जोहराद्दून करतो. त्याच्या कुटुंबियांचीही परिसरात मोठी दहशत आहे. त्याच्यावर चोरी, मारामारी, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दहशत माजवणे आदी विविध ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यांपूर्वीच तो तडीपारीची शिक्षा भोगून आला होता. आपल्या हद्दीत दुसऱ्याने अनधिकृत झोपड्या बांधल्याने त्याला ते सहन झाले नाही. त्या रागातून त्याने हा हल्ला घडवला, असे आरे पोलिसांनी सांगितले.