मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२.५५ च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.७५ मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. भरतीच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडल्यास सखलभागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळल्यानंतर उसळणाऱ्या सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा आणि त्याच वेळी कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे नैसर्गिक पद्धतीने पाण्याचा निचरा होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखलभागात पाणी साचते. हवामान विभागाने मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार भरतीच्या कालावधीत मुसळधार पाऊस पडल्यास सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यातील भरती ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार समुद्राला आज मोठी भरती येणार आहे. दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असून सुमारे ४. ७५ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
पहिल्याच पावसात मुंबईतील सखलभागात पाणी साचून मुंबईकरांची दैना उडाली होती. परिणामी, वाहतूक सेवा विस्कळीत झाली. नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते. आता मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र भरतीच्या कालावधीत पाऊस पडलाच तर पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काळजी काय घ्यावी ?
- मोठी भरती असेल तेव्हा नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये.
- इतर दिवशी भरतीच्या कालावधीतही किनाऱ्यावर जाणे टाळावे.
- प्रशासन तसेच हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.