मुंबई : तक्रार करण्यासाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेलेल्या एका रिक्षाचालकाला चौघांनी पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण केली. यावेळी रिक्षाचालकाला सोडविण्यासाठी धावलेल्या पोलिसांवर या चौघांनी हल्ला केला. या चौघानी केलेल्या मारहाणीत ३ पोलीस किरकोळ जखमी झाले.
रिझवान शेख हा रिक्षाचालक असून सांताक्रूझ येथील गझरबांध परिसरात राहतो. शनिवारी दुपारी रिक्षा उभी करण्यावरून त्याचा काही स्थानिकांशी वाद झाला होता. यानंतर प्रकरण हातघाईवर आले. रिझवान तक्रार देण्यासाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आला. रिझवान पोलीस ठाण्यात गेल्याचे समजताच आशिष शर्मा सोबत नरेश पाटील, दिव्येश ठाकूर आणि अन्य एका साथीदाराला घेऊन तेथे पोहोचला. त्यांनी पोलीस ठाण्यातच रिझवानला मारहाण करण्यास सुरवात केली.
मारामारी सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला या चौघांनी मारहाण केली. या मारहाणीत सहायक निरीक्षक भूषण मोरे, उपनिरीक्षक साईनाथ पंतमवाड, हवालदार पर्वीण सुरवसे किरकोळ जखमी झाले. पोलीस ठाण्यात हाणामारी करणारा मुख्य आरोपी आशिष शर्मा याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.