मुंबई : माझा नातू छळ करत असल्याची तक्रार ७५ वर्षीय वृध्देने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी या वृध्देच्या नातवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर नातू सदनिका नावावर करण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार या वृध्देने केली आहे. नातवाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

तक्रारदार ७५ वर्षीय वृध्द महिला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह रहात होती. तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मोठा नातू हा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. तो वृध्देच्या मुलास त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून त्या महिलेच्या ५५ वर्षीय मुलाने २९ मे २०२५ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती, असे या तक्रारीत म्हटले आहे.


पैशांसाठी आजीचा छळ केल्याचा आरोप


पित्याच्या मृत्यूनंतरही मुलाने संपत्तीसाठी मला त्रास देण्यास सुरवात केली. तो सतत पैशांची मागणी करू लागला. नातवाच्या त्रासाला कंटाळून मी मुलीकडे राहण्यासाठी गेली. पंरतु नातू तिथेही येऊन मला त्रास देऊ लागला, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. गोरेगावमध्ये त्यांची एक सदनिका (फ्लॅट) होती. आजीने ही सदनिका एका बिल्डरला विकून टाकली. त्यामुळे त्यांचा नातू अधिकच चिडला. या सदनिकेचे सर्व पैसे देण्याची मागणी त्याने केली. मात्र नातू हे पैसे नशेसाठी खर्च करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ते दिले नाहीत. त्यामुळे तो आजीला अधिकच त्रास देऊ लागला, असेही या तक्रारीत म्हटले आहे. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने आजीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारदार वृघ्देचा २५ वर्षीय नातूने आजीचे हे आऱोप फेटाळले आहेत. आमच्यात कौटुंबिक वाद आहेत. मात्र त्यासाठी आम्ही दोन्ही भावांना, आईला बदनाम केले जात आहे, असे त्याने सांगितले. मी नशा करत नाही मात्र हेतुपुरस्सर असे आरोप केले जात असल्याचे त्याने सांगितले.

याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी नातवाच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमाच्या कलम २४, तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१ (२) (धमकावणे) आणि ३५२ (सार्वजनिक शांतेतचा भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.