मुंबई : सहआरोपींना जामीन मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जंबो करोना काळजी केंद्र घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजीत पाटकर यांना महानगरदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. मात्र, पाटकर हे आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटकेत असल्याने या प्रकरणी जामीन मंजूर होऊनही त्यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.
पाटकर यांच्यासह अन्य आरोपींवरील हा खटला अद्याप सुरू झालेला नाही. तो सुरू होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे, नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही. याशिवाय, प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पाटकर आणि अन्य आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अन्य आरोपींना जामीनही मंजूर झाला असून पाटकर हेही जामीन मिळण्यास पात्र आहेत, असे देखील न्यायालयाने पाटकर यांना जामीन मंजूर करताना प्रामुख्याने नमूद केले.
हेही वाचा : मुंबई : एमएमआरडीए ‘मेट्रो ५’साठी २२ गाड्या खरेदी करणार
वरळी आणि दहिसर येथील जंबो करोना काळजी केंद्राचे कंत्राट मिळवण्याकरिता बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाप्रकरणी पाटकर यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करण्यात आला. ईओडब्ल्यूकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे येथेही पाटकर यांच्यावर असाच गुन्हा दाखल असून या गुन्ह्यांच्या आधारे ईडीनेही त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांना अटक केली होती.