मुंबई : वाकोला येथील सिग्नलजवळ २७ जुलै २०२४ रोजी झालेल्या अपघातात पीटर थॉमस डीसोझा (५६) यांना दुचाकीने धडक दिली होती. या अपघातानंतर काही दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराने डीसोझा यांना कोणतीही वैद्यकीय मदत न करता अपघातस्थळावरून पळ काढला होता. हिट ॲण्ड रनच्या या घटनेनंतर जवळपास आठ महिन्यांनी मुंबई पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी स्वतः दुपारी याबाबतची तक्रार दिली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने अधिक तपास करीत आहेत.

घटनास्थळावरून दुचाकीस्वार पळाला

सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला परिसरातील हनुमान मंदिराजवळील पश्चिम द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. त्यावेळी पीटर डिसोझा रस्त्यावरून पायी जात होते. भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यानंतर दुचाकीस्वार तेथे थांबलाच नाही. त्याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. अपघात झाला त्यावेळी तेथे उपस्थित राहूल ॲन्थनी जखमी झालेल्या डिसोझा यांच्या मदतीला धावला. त्यावेळी ते गंभीर जखमी अवस्थेत खाली पडले होते. राहूलने त्यांना जवळच्याच व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची स्थिती गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ डिसोझा यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले.

डॉक्टरांनीच प्रक्रिया पूर्ण केली

डिसोझा यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवता आला नाही. तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांनीच सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. डिसोझा यांच्या नातेवाईकांची कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ओळखपत्राच्या आधारे नातेवाईकांचा शोध घेतला. त्यावेळी डिसोझा यांच्या भाचीबद्दल माहिती मिळाली. डिसोझा यांची भाची शबाना शरीफ खान ऊर्फ न्यान्सी यांनी पुढील उपचारांसाठी त्यांना नायर रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू असतानाच डिसोझा यांची प्रकृती खालावली आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पीटर डीसोझा यांचा मृत्यू झाला.

आरोपीचा शोध सुरू

डिसोझा यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी मोटरसायकलस्वाराविरोधात तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई योगेश भगचंद नागरे यांनी सरकारच्या वतीने तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे, तसेच जखमीला वैद्यकीय सहाय्य न करणे अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळाजवळील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासत आहेत. याशिवाय इतर प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.