मुंबई: कुर्ला (पश्चिम) येथील सीएसटी मार्गावर ऑटोमोबाईल्सच्या सुट्या भागांचा साठा असलेल्या गाळ्याला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. रात्रभर ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र पहाटे ही आग आणखीनच भडकल्याने आजूबाजूचे २० गाळे या आगीत जळून खाक झाले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.
कुर्ला (पश्चिम), सीएसटी रोड कपाडिया नगर येथील गुरुद्वारा परिसरात वाहनांचे सुटे भाग, टायर, विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे, भंगार सामान आणि इतर साहित्य इत्यादींचा साठा असलेले अंदाजे ३००० चौरस फूट क्षेत्रफळाचे बैठे, एकमजली गाळे आहेत. या गाळ्यांपैकी एका गाळ्यात मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग टायर, विद्युत वाहिन्यांचा साठा, विजेच्या उपकरणांचा साठा, भंगार सामान आणि इतर ज्वलनशील साहित्यांमुळे भडकली आणि पसरली. त्यामुळे अंदाजे १५ ते २० गाळ्यांमध्ये ही आग पसरली. परिणामी हे गाळे जळून खाक झाले. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली.
भीषण आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम हाती घेतले. तसेच, गाळ्यांना लागलेल्या आगीची माहिती मिळताच गाळेधारक, मालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
दरम्यान, आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री २.४३ वाजता आग स्तर – १ ची आणि त्यानंतर मध्यरात्री २.५७ वाजता आग स्तर – २ ची असल्याचे जाहीर केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सदर आगीवर ४ फायर इंजिन, १० जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या भीषण आगीवर पाच तासांनी नियंत्रण मिळविले आणि सकाळी ७.२४ वाजता आग संपूर्णपणे विझविली.
दरम्यान, ही आग का आणि कशी लागली, आगीचे नेमके कारण काय याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान हे अधिक तपास करत आहेत. मात्र कुर्ला परिसरात असलेल्या या गाळ्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात.