मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) देण्यात येणारी अधिछात्रवृत्ती २०२१-२२ प्रमाणे २०२३ वर्षातील सर्व अर्जदार व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी, या मागणीसाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे सोमवार, ३० ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणात ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्योती’ संस्थेतर्फे २०२० पासून राज्यातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती’च्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते. सदर अधिछात्रवृत्ती ही २०२१-२२ प्रमाणे २०२३ वर्षातील सर्व अर्जदार व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांकापासून द्यावी, २०२१, २०२२ व २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती द्यावी, यूजीसीच्या ५७२ व्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीची रक्कम ३१ हजार रुपयांवरून ३७ हजार रुपये (जेआरएफ) व ३५ हजार रुपयांवरून ४२ हजार रुपये (एसआरएफ) देण्याबाबतचे परिपत्रक २० सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून या नियमाची त्वरित अंमलबजावणी करावी आणि केंद्र सरकारच्या २०१९ मधील नियमानुसार घरभाडे भत्ता वाढवून द्यावा, या प्रमुख मागण्या महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने केल्या आहेत.

हेही वाचा : सार्वजनिक आरोग्य विभागातील सक्तीने निवृत्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने संशोधन बंद करण्याच्या व प्रवेश रद्द करण्याचा विचार करीत आहेत. ‘महाज्योती’ ही संस्था गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम काम करीत आहे. परंतु २०२३ या वर्षातील अवघ्या २०० संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी २०२१-२२ प्रमाणे २०२३ वर्षातील सर्व अर्जदार व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी. सरसकट अधिछात्रवृत्तीसाठी महाज्योतीप्रमाणे सारथी व बार्टीमधीलही सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे राज्यातील विविध जिल्ह्यांत साखळी उपोषण सुरू आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात यावी’, असे महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर यांनी सांगितले.