Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या लाखो आंदोलकांची मात्र मुंबईत मोठी गैरसोय होत आहे. पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला आहे तर दुसरीकडे झोपण्याची बसण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आक्रमक आंदोलकांनी शनिवारी सकाळी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.

पालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर चूल मांडून २० किलो पोहे रांधण्यात आले आहेत, तर दुसरीकडे काही आंदोलकांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्क मुंडन आंदोलन केले आहे. आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पालिका मुख्यालय आणि सीएसएमटी समोर प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी झाली असून पोलीस प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून मराठा आंदोलक शुक्रवारी पहाटेपासून मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. अजूनही आंदोलक मुंबईत दाखल होतच आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत, त्यातही पालिका मुख्यालय आणि सीएसएमटी परिसर आंदोलकांनी भरला आहे.

अंघोळीची, नाश्त्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची योग्य सोय नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार जाणिवपूर्वक मराठा आंदोलकांची गैरसोय करत आहे. त्यांना आंदोलन दडपायचे आहे, असे म्हणत आंदोलक आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने या आंदोलकांनी शनिवारी सकाळी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

सरकारने जरी आमची खाण्यापिण्याची सोय केली नसली तरी आम्ही मराठा बांधव आमची रसद घेऊन आलो आहोत. आंदोलकांना काही कमी पडू देणार नाही असे म्हणत रस्त्यावरच ठिय्या दिला आहे. पालिका मुख्यालयासमोर एकीकडे पोहे शिजवले जात असताना दुसरीकडे काही आंदोलकांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्क मुंडन आंदोलन केले.

आंदोलकाच्या या आक्रमक भूमिकेमुळे पालिका मुख्यालय, सीएसएमटी आणि पुढे जे जे उड्डाणपूलावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या आंदोलकांना रस्त्यावर हटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. आझाद मैदानाबाहेर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे. तर परिमंडल -१ चे उपायुक्त प्रवीण मुंडेही आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र साधी चहाची टपरीही सुरु नसल्याचे म्हणत आंदोलक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पालिका मुख्यालयासमोर आंदोलकांची मोठी गर्दी आहे.