मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील १४९ दुकानांच्या विक्रीची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. मुंबई मंडळाने अखेर गुरुवारी ई लिलावाची अधिकृत घोषणा करत वेळापत्रक जाहिर केले आहे. त्यानुसार १४९ दुकानांच्या ई लिलावासाठीची नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर २९ आॅगस्टला ई लिलावाचा निकाल जाहिर केला जाणार आहे. या ई लिलावात मुंबई मंडळाच्या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार दुकानांसाठी विजेता ठरणार असून त्या पात्र विजेत्यास दुकानाचे वितरण केले जाणार आहे.
म्हाडाच्या प्रत्येक प्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकाने बांधली जातात. पीठाची गिरणी, औषध दुकान, भाजीपाल्याचे दुकान आणि इतर दुकानांचा यात समावेश असतो. बँक, एटीएमचाही समावेश असतो. या दुकानांची विक्री मंडळांकडून ई लिलावाद्वारे केली जाते. मंडळाकडून नियमानुसार दुकानाच्या क्षेत्रफळानुसार एका बोली निश्चित केली जाते. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार ई लिलावात विजेता ठरतो. त्यानंतर पुढील कार्यवाही करत त्याला दुकानाचे वितरण केले जाते. मुंबईत निवासी गाळ्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशावेळी म्हाडाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दुकाने खरेदी करता येतात. दुकानांच्या ई लिलावाकडे अनेकांचे लक्ष असते. त्यानुसार मागच्या वर्षी मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव मुंबई मंडळाने केला होता. मात्र दुकानांच्या किंमती अधिक असल्याने आणि दुकान काही विशिष्ट वापरासाठी राखीव असल्याने मागच्या वर्षी दुकानांच्या ई लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही.
१७३ दुकानांपैकी केवळ ४९ दुकानांची विक्री यावेळी झाली होती. तर १२४ दुकाने रिक्त राहिली होती. दुकानांच्या किंमती अधिक असल्याने आणि वापराची अट जाचक असल्याने मंडळाने किंमती कमी करून दुकानांच्या वापराची अट शिथिल केली. दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दोन पट किंवा अनिवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या एक पट यात जो दर अधिक असेल तो दर लागू करत किंमत, बोली निश्चित केली जाते. पण आता १४९ दुकानांतील १२४ जुन्या दुकानांच्या किंमतीत, बोलीत मंडळाने घट केली आहे. या दुकानांसाठी निवासी मालमत्तेच्या रेडीरेकनर दराच्या दीड पट दराने बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे आता परवडणाऱ्या दरात दुकाने खरेदी करता येणार आहेत.
दुकानांच्या ई लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे ०६ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, तुंगा पवई येथे ०२, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे ०६, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे ०६ अनिवासी गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे ०९, अँटॉप हिल वडाळा येथे ०३, मालवणी मालाड येथे ४६, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७, शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी ०१ अशा एकूण १४९ दुकानांचा समावेश आहे.
सहभागी कसे व्हाल?
या ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन १२ आॅगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून भरता येणार आहे. तर २५ आॅगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर २८ आॅगस्टला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी आॅनलाईन बोली स्वरुपातील ई लिलाव http://www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे.त्यानंतर २९ आॅगस्टला सकाळी ११ वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.