मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांना मुंबईतच परवडणाऱ्या किंमतीत घरे द्यावीत या मागणीसाठी बुधवार, ९ जुलै रोजी गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकणार आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १४ संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबईसह महाराष्ट्रभरातून बुधवारी सकाळी ११ वाजता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या मोर्चामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.
गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी म्हाडाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि वारसांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात २५ हजार कामगारांनाच मुंबईतील घरांच्या योजनेत सामावून घेणे सरकारला शक्य झाले आहे. दीड लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा नसल्याने राज्य सरकारने मुंबईबाहेर मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन खासगी विकासकाच्या माध्यमातून शेलू आणि वांगणी येथे ८१ हजार घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र या घरांना गिरणी कामगार, वारस, संघटनांचा विरोध आहे. हे प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची मागणी राष्ट्राय मिल मजदूर संघासह १४ संघटनेचा समावेश असलेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने केली आहे. मात्र या मागणीकडे काणाडोळा करत राज्य सरकारने शेलू आणि वांगणीतील घरांसाठी गिरणी कामगारांकडून संमतीपत्र, अर्ज सादर करून घेतले जात आहेत. त्यामुळे आता गिरणी कामगार आक्रमक झाले आहेत. मुंबईत घरे देण्याची मागणी मान्य होत नसल्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाने बुधवारच्या मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात १४ संघटना सहभागी होणार आहेत.
घरांसाठी मुंबईत जागा का नाही
राणीबाग – आझाद मैदान दरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र या मोर्चास परवानगी न मिळाल्याने गिरणी कामगार, वारस थेट आझाद मैदानावर धडकतील, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पदाधिकारी गोविंदराव मोहिते यांनी दिली. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला मुंबईभर घरासाठी जागा दिल्या जात आहेत. मिठागराच्या जागा खुल्या केल्या जात आहे. मात्र मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांसाठी मुंबईत घरांसाठी जागा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, बुधवारच्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज्य ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचे मोहिते यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.