मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) चारकोप येथील तब्बल १२ सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी असलेले फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री करावयाच्या इमारतीसाठी वापरून घोटाळा करण्याचा वास्तुरचनाकारांचा प्रयत्न इमारत परवानगी कक्षातील अधिकाऱ्याने हाणून पाडला आहे. अन्यथा या पुनर्विकासात उभ्या राहिलेल्या इमारतींमधील मजले पाडण्याची पाळी म्हाडावर आली असती. आता या सहकारी गृहनिर्माण संस्थांना चटईक्षेत्रफळ विकत घेऊन पुनर्विकास पूर्ण करावा लागणार आहे.

कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात म्हाडाने अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना भूखंडाचे वाटप केले होते. या भूखंडावर उभ्या राहिलेल्या सर्व इमारती आता जुन्या झाल्या आहेत. यापैकी अनेक इमारतींचा सध्या पुनर्विकास सुरु आहे. यापैकी तब्बल १२ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वतीने म्हाडाकडे पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावात पुनर्वसनासाठी असलेले फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री करावयाच्या इमारतींसाठी वापरण्याचे प्रस्तावीत करण्यात आले होते. याबाबतचा प्रस्ताव तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी मंजूर करुन इमारत बांधणीसाठी प्रमाणपत्रही जारी केले. विकास नियंत्रण नियमावली २०३४ अन्वये ३३(५) आणि ३३(१) नुसार पुनर्वसनातील सदनिकांसाठी लागू असलेले फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री घटकातील सदनिकांसाठी वापरता येऊ शकत नाही, असे नमूद होते.

हेही वाचा…मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका

तरीही इंडियन ऑईल, अरिहंत, जीवनमंगल, प्रियांका आणि आनंद या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्वसनासाठी असलेले फंजीबल चटईक्षेत्रफळ विक्री घटकातील सदनिकांसाठी वापरले जात असल्याचे विद्यमान कार्यकारी अभियंते रुपेश तोटेवार यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर इमारतीचे सुरु असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्यात आले. या पाच सहकारी संस्थांसह आणखी सात सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अशा पद्धतीने प्रस्ताव सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या इमारतींच्या बांधकामांना स्थगिती देण्यात आली.

या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना चटईक्षेत्रफळ विकत घेण्यास सांगण्यात आले. मात्र आपण सादर केलेला प्रस्ताव कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न संबंधित वास्तुरचनाकारांनी केला. मात्र नियमावलीत ते बसत नसल्याने इमारत परवानगी कक्षाने चटईक्षेत्रफळ विकत घेतल्यानंतरच इमारतीचे बांधकाम सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

हेही वाचा…मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

चटईक्षेत्रफळ घोट्याळ्याची चूक वेळीच लक्षात आल्यामुळे अनर्थ टळल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. अन्यथा इमारतींचे मजले पाडण्याची वेळ म्हाडावर आली असती व रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. म्हाडाकडे नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी आल्यानंतर स्वतंत्र इमारत परवानगी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या कक्षाकडून काटेकोरपणे परवानगी देण्याची कार्यवाही होण्याची आवश्यकता होती. परंतु काही मुठभर वास्तुरचनाकारांच्या दबावामुळे असा प्रकार घडला असावा, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका

ही चूक वेळीच निदर्शनास आल्यामुळे अनर्थ टळला. संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांनी चटईक्षेत्रफळ विकत घेतले असून आता फक्त दोनच सहकारी गृहनिर्माण संस्था शिल्लक आहेत. या दोन्ही संस्थाही चटईक्षेत्रफळ विकत घेणार आहेत – रुपेश तोटेवार, कार्यकारी अभियंता (पश्चिम उपनगरे)