मुंबईः डोंगरी येथे पेट्रोल पंपावर पेट्रोलचे पैसे न देता मोटरीसोबत कर्मचाऱ्याला फरफटत नेल्याचा गंभीर प्रकार घडला. आरोपींनी कर्मचाऱ्याला नेऊन त्याच्या खिशातील रक्कम काढून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कळवा परिसरात वास्तव्यास असलेला तक्रारदार शिवशंकर वसंतराज गुप्ता (२३) वाडीबंदर येथील पी. डिमेल्लो रोडवरील साई पेट्रोल पंपावर काम करतो. त्याच्या पेट्रोपंपावर बुधवारी हिरव्या रंगाची टाटा पंच ही मोटर पेट्रोल भरण्यासाठी आली होती. या मोटारीत ६०० रुपयांचे पेट्रोल भरण्यात आले.

हेही वाचा : वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराने त्याच्याकडे पैसे मागितले असता गाडीतील व्यक्तींनी ते देण्यास नकार दिला व मोटर सुरू केली. गुप्ता त्यांना वारंवार पैसे देण्यास सांगत होता. तेवढ्यात आरोपींनी मोटरगाडीचा वेग वाढवण्यास सुरूवात केली. त्यामुळे गुप्ताने दरवाजा पकडला. पण त्यांनी गाडी थांबवली नाही व गुप्ताला फरफटत नेले. त्यानंतर आरोपींनी त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. या प्रकारानंतर गुप्ताच्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाद्वारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. मोटरीचा क्रमांक पोलिसांना मिळाला असून त्यद्वारे पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.