मुंबई : ‘मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांचीच ताकद आहे. या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत ताकद नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा,’ असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले. एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटणे बंद केले तर त्यांच्याकडील कार्यकर्तेही निघून जातील, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. निवडणुकीकरिता प्रत्येक मतदार यादी तपासून पहाण्याचे आदेश या वेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. तर प्रत्येक शाखा अध्यक्षांनी आपल्या विभागामध्ये मतदार यादीत २ जणांची नेमणूक करावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. फक्त सभेला गर्दी होते म्हणून आपण निवडणूक जिंकू शकत नाही, तर आपल्याला निवडणुकीची यंत्रणा ही खालच्या स्तरापर्यंत राबवायला हवी, अशी सूचना त्यांनी केली.

‘लोढा एका धर्माचे मंत्री नाहीत’

स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊन सरकार स्वातंत्र्य दिनीच लोकांचे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. कबुतरांच्या नावाखाली राजकारण करताना मंगलप्रभात लोढा यांनी ते राज्याचे मंत्री आहेत, एका समाजाचे मंत्री नाहीत याचे भान ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला. शाकाहारी-मांसाहारी असा वाद निर्माण करणे चुकीचे आहे. आपण काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगणारे सरकार कोण? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांच्याविरुद्ध याचिका

मुंबई : मराठी- अमराठी वादाप्रकरणी उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात याचिका करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी ही याचिका केली आहे. द्वेष आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करून भारतीय निवडणूक आयोगाला लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ अंतर्गत मनसेची मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्याची प्रमुख मागणी शुक्ला यांनी याचिकेद्वारे केली आहे. याशिवाय, ठाकरे यांच्याकडून केली जाणारी द्वेषपूर्ण भाषणे, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही शुक्ला याचिकेत केली आहे.