मुंबई : मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाइक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप व बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.

मोटार वाहन अधिनियम कलम ६६ नुसार खासगी वाहनाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करता येत नाही. तसे केल्यास कलम १९२ नुसार दंडात्मक व दंडविधानात्मक कारवाई होऊ शकते. या बेकायदेशीर वाहन सेवेचा उपयोग करून शासनाची व प्रवाशांची फसवणूक होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत या बेकायदेशीर सेवा रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

कायद्याचे उल्लंघन सुरू

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ नुसार, कोणत्याही प्रवासी वाहतूक सेवेच्या संचालनासाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही ॲप कंपन्या व चालक हे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे उघड झाले आहे.

परवाना न घेता बाइक टॅक्सी सुरू

बाइक टॅक्सी नियमावलीला राज्य सरकारने मंजुरी दिलेली नसताना देखील ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवठादार कंपन्यांनी त्यांची बाइक टॅक्सी सेवा मुंबईत सुरू केली. त्यामुळे आता रॅपिडो, उबेर व ओला या ॲपच्या माध्यमातून महानगर क्षेत्रात बेकायदेशीर व परवाना न घेता प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवासी वाहतुकीला मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ९३ व मोटार वाहन ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२० यांच्या अधीन राहून परवाना घेणे आवश्यक असताना, संबंधित कंपन्यांकडून कोणतीही वैध परवानगी न घेता ॲपच्या माध्यमातून बाइक टॅक्सी सेवा दिली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरटीओने मुंबई महानगरात केली कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), मुंबईच्या २० विशेष पथकांनी एकाच वेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे संयुक्त कारवाई मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये एकूण ९३ बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. त्यातील ८५ बाइक टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध ॲप ऑपरेटर विरोधातही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.