मुंबई: लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये वेगाने वाढणाऱ्या गाठींमुळे त्रास देणाऱ्या ‘बार्किट लिम्फोमा’ हा कर्करोगाचा आजार तसा दुर्मिळ म्हणावा लागेल. बी-लिम्फोसाईट्सवर परिणाम करणारा हा अतिजलद वाढणारा नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा प्रकार असून योग्य वेळी निदान झाले तर उपचाराने बरे होण्याची संधी मोठी असते. मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये या कर्करोगाचा आजार झालेल्या चार वर्षाच्या मुलावर वेळीच झालेल्या योग्य उपचारांमुळे त्याचा जीव वाचू शकला आहे.

या मुलाच्या पालकांना उजव्या बाजूच्या ओटीपोटात वेगाने वाढणारी गाठ दिसली होती. त्यामुळे त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये आणले. फक्त एका आठवड्यात त्याचे वजन बरेच वाढले, ज्यामुळे तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलाची यूएसजी-मार्गदर्शित बायोप्सी आणि ट्यूमरचा (गाठीचा) टप्पा निश्चित करण्यासाठी सीबीसी, एलडीएच व पीईटी-सीटी स्कॅनसह अनेक मुलभूत तपासण्या करण्यात आल्या. यानंतर स्पोरॅडिक बर्किट लिम्फोमाचे निदान झाले. हा दुर्मिळ आणि वेगाने वाढणारा नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा आहे, ज्याचा बी-पेशींवर परिणाम होतो.

या आजाराचे तीन प्रमुख प्रकार आहेत. आफ्रिकन देशांमध्ये दिसणारा एंडेमिक प्रकार प्रामुख्याने जबडा किंवा चेहऱ्याच्या हाडांत गाठ निर्माण करतो. जगातील इतर भागांत दिसणारा स्पोरॅडिक प्रकार मात्र प्रामुख्याने पोटातील अवयवांमध्ये आढळतो. तर रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या (एचआयव्ही/एड्ससारख्या) रुग्णांमध्ये इम्युनोडिफिशियन्सी-संबंधित प्रकार दिसतो.

लक्षणांमध्ये जबड्यात किंवा पोटात वेगाने वाढणारी गाठ, ताप, वजन घटणे, घाम येणे, आतड्यात अडथळा किंवा सूज यांचा समावेश होतो. निदानासाठी बायोप्सी, हिस्टोपॅथॉलॉजी तसेच सायटोजेनेटिक चाचण्या केल्या जातात. तज्ज्ञांच्या मते, भारत व पाश्चिमात्य देशांत बार्किट लिम्फोमा दुर्मिळ मानला जातो. एकूण नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा रुग्णांपैकी केवळ एक ते दोन टक्के रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. मात्र आफ्रिकन देशांत हा तुलनेने सामान्य असून एप्स्टीन-बार विषाणूसोबत त्याचा संबंध दिसतो.यावर उच्च मात्रेतील केमोथेरपी व कधी कधी इंट्राथेकल (मेंदू-रीढ़ीत) उपचार केले जातात. योग्य वेळी उपचार मिळाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता जास्त असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजाराच्या प्रगत टप्प्यामुळे मुलावर विशेष काळजी घेत बहुआयामी उपचार करण्यात आले, ज्यामध्ये आक्रमक केमोथेरपी, रितुक्सिमाबसह इम्युनोथेरपी, इंट्राथेकल केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया यांचे एकत्रिकरण होते. रितुक्सिमाब हे अँटी-सीडी२० अँटीबॉडी असून कर्करोगाच्या बी-पेशींना लक्ष्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, पण संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते, ज्यामुळे जवळून देखरेख आणि सहाय्यक काळजी आवश्यक असते.

जवळपास आठ महिने चाललेल्या उपचारादरम्यान मुलाला अनेक तापजन्य न्यूट्रोपेनिया एपिसोड्सचा अनुभव आला, जो केमोथेरपीचा सामान्य, पण संभाव्य जीवघेणा दुष्परिणाम आहे.संपूर्ण ट्यूमर काढून टाकण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाने केमोथेरपी पूर्ण केली आणि आता त्याला कोणताही आजार नाही. तो दर महिन्याला रक्त तपासण्या करण्यासोबत नियमितपणे फॉलो-अप घेत आहे. तसेच प्रकृती स्थिर असण्याच्या खात्रीसाठी दर तीन महिन्यांनी इमेजिंग केले जात आहे.

बर्किट लिम्फोमा हा वेगाने वाढणारा कर्करोग आहे, पण वेळेवर निदान, उत्तम उपचार आणि व्यापक सहाय्यक काळजी घेतल्यास आपण ९० टक्क्यांहून अधिक बरा होण्याचा दर गाठू शकतो, असे एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, हेमॅटो-ऑन्कोलॉजी आणि बीएमटीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रीती मेहता यांनी सांगितले. या मुलाबाबत त्या म्हणाल्या या गुंतागूंतीच्या केसचे व्यवस्थापन करण्यासाठी पीडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन आणि क्रिटिकल केअर टीम यांचा एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे.