मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरात एका महिलेने शिरण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. मूळची दुबई येथे राहणारी महिला सोमवारी दुपारी भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आदित्य रॉय कपूरच्या घरात शिरली आणि दारातच ठाण मांडून बसली होती. शेवटी खार पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मागील आठवड्यात अभिनेता सलमान खानच्या घरात एका महिलेने शिरण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे सेलिब्रेटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अभिनेता आदित्य रॉय कपूर वांद्रे (प.) येथील रिझवी संकुलातील पॅसिफिक हाईटस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो. सोमवारी तो चित्रिकरणासाठी घराबाहेर गेला होता. दुपारी १ वाजता एका अनोळखी महिलेने दारवाजा वाजवला. घरात काम करणाऱी गृहसेविका संगिता पवार (४९) हिने दार उघडले. एक अनोळखी महिला दारात उभी होती. मला आदित्य रॉय कपूर यांना भेटवस्तू द्यायची आहे, भेटवस्तू थेट त्यांच्याच हातात द्यायची आहे, असेही तिने सांगितले. भेटीसाठी कितीची वेळ दिली आहे, असे विचारल्यावर संध्याकाळी ६ ची वेळ असल्याचे त्या महिलेने सांगितले. त्यामुळे पवार यांनी त्या महिलेला संध्याकाळी येण्यास सांगितले. परंतु ती जाण्यास तयार नव्हती.
नेमका त्याचवेळी अभिनेता आदित्य रॉय कपूर घरात आला. तेव्हा ती महिला त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली. ते पाहून गृहसेविका संगिता पवारने प्रसंगावधान दाखवत आदित्य रॉय कपूरला घराबाहेर जाण्यास सांगितले आणि त्वरित हा प्रकार आदित्य रॉय कपूरच्या प्रॉडक्शन मॅनेजर श्रुती राव यांना सांगितला. श्रुती राव घटनास्थळी आल्या. दरम्यान, ती अनोळखी महिला दारातच ठाण मांडून बसली होती. त्यानंतर खार पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक तात्काळ तेथे आले. या महिलेचे नाव गझाला सिद्दीक (४७) असून आपण दुबईत राहात असल्याचे तिने सांगितले. आदित्य रॉय कपूरच्या घरात येण्याच्या उद्देश काय आहे याबाबत ती काही समर्पक उत्तरे देऊ शकली नाही. खार पोलिसांनी तिला अटक करून तिच्याविरोधात घरात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. खार पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
मागील आठवड्यात अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेटमधील घरात ईशा छाब्रिया या तरुणीने मध्यरात्री शिरण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणानंतर उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या सेलिब्रेटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.