मुंबई : वाढते इंधन दर आणि कमी झालेल्या भाडे दरामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या नालासोपाऱ्यातील ॲप आधारित वाहनचालक सनोज सक्सेना (४५) याने आत्महत्या केली. गेली अनेक वर्षे ओला, उबर या ॲपद्वारे वाहन चालविण्याचे काम तो करीत होता. सक्सेनाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि आमरण उपोषण सुरू ठेवण्यासाठी, सर्व चालक आझाद मैदानात एकवटले आहेत. तर, चालकांअभावी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी सेवा विस्कळीत झाली आहे.

आमरण उपोषण सुरू

नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात सक्सेना राहत होता. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत अडकल्याने गुरुवारी त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपाला वेगळे वळण लागू नये,, तसेच कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी शुक्रवारी आझाद मैदानात २० संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी संप सुरू केला. मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिला.

मुंबई विमानतळ प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

राज्यातील काही ॲप आधारित टॅक्सी चालकांनी सुरू केलेल्या संपामुळे विमानतळावर ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होईल. त्यामुळे ॲप आधारित टॅक्सीची उपलब्धता मर्यादित असू शकते. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आणि पर्यायी वाहतुकीचा अवलंब करावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने केले.

प्रवाशांना करावा लागला अडचणींचा सामना

ओला, उबर किंवा अन्य ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी आरक्षित केल्यानंतर प्रवासी ते वाहन येण्याची वाट बघत होते. परंतु, गुरुवारी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी चालकांनी १०० टक्के बंदचा नारा दिला. ॲप आधारित वाहन बंद असल्याने प्रवाशांना वाहने उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहनांचा वापर करावा लागला. पुणे आणि नाशिकवरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. येथील बहुसंख्य नोकरदार ॲप आधारित वाहनांचा वापर करतात. मात्र, चालकांनी गुरुवारी बंदची हाक दिल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली.

संप सुरूच राहणार

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेल्या दरानुसार ॲप आधारित चालकांना रक्कम मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये ॲप आधारित वाहन चालकांचा संप सुरू आहे. राज्यातील प्रत्येक भागात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर, या संपाची व्यापकता वाढविण्यासाठी ॲप आधारित वाहन चालक एकत्र आले आणि गुरुवारी बंदची हाक देण्यात आली. परंतु, काही चालकांनी आपली सेवा सुरू ठेवल्याने मारहाण, वादावादी झाली. तर, काही भागात सेवा देणाऱ्या चालकांना संपकऱ्यांनी फळे देऊन, फुलांचा हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आर्थिक संकटात सापडलेल्या ॲप आधारित एका वाहन चालकाने आत्महत्या केली. आझाद मैदानात शुक्रवारी ॲप आधारित चालकांचा संप सुरू राहणार आहे.