मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक असा ८.८ किमीचा पाॅड टॅक्सी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पाचा हा पहिला टप्पा असून या टप्प्याचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. अशात आता या प्रकल्पाचा दुसर्‍या टप्प्याअंतर्गत बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक असा विस्तार केला जाणार आहे. मात्र या विस्तारित मार्गासंबंधीचा अंतिम निर्णय होण्यास तसेच कामास सुरुवात होण्यास बराच वेळ लागणार आहे. त्यामुळेच या विस्तारित मार्गाच्या पूर्णत्वासाठी २०४१ चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. असे असले तरी पाॅड टॅक्सीचा बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक असा विस्तार झाल्यास त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने अत्याधुनिक अशा पाॅड टॅक्सीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यानुसार कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक अशी पाॅड टॅक्सी सेवा सार्वजनिक-खासगी सहभागातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंचलित जलद वाहतूक प्रणालीअंतर्गत ८.८ किमीच्या मार्गाच्या उभारणीचे, देखभाल आणि संचलनाचे कंत्राट हैद्राबादमधील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. या कंपनीने या प्रकल्पासाठी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर पाॅड टॅक्सीची सेवा देणार्‍या मे. अल्ट्रा पीआरटी कंपनीची मदत घेतली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून सध्या प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे काम सुरु आहे. या परवानग्या मिळाल्यास प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.

हेही वाचा – मेट्रो ९ च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू, कंत्राटदार आणि सल्लागारास मोठा दंड, चौकशीसाठी समिती स्थापन

u

पाॅड टॅक्सीचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. अशात आता पहिल्या टप्प्यातील या मार्गाचा विस्तार करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक असा १३.५ किमीने पाॅड टॅक्सीचा दुसर्‍या टप्प्याअंतर्गत विस्तार केला जाणार आहे. याबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक स्तरावर ही चर्चा सुरु असून यासंबंधीच्या अंतिम निर्णयासाठी बराच वेळ लागणार असल्याचे म्हणत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाॅड टॅक्सी प्रकल्पाच्या अहवालामध्ये दुसर्‍या टप्प्याबाबतची माहिती नमूद आहे. त्यानुसार १६ स्थानकांचा हा विस्तारीत पाॅड टॅक्सी मार्ग असणार असून हा टप्पा २०४१ पर्यंत कार्यान्वित केला जाणार आहे.

हेही वाचा – मुबलक पाण्याची प्रतीक्षाच! सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक मार्गातील १६ स्थानके अशी

न्यू मिल रोड (कुर्ला), इक्विनाॅक्स, टॅक्सीमेन काॅलनी, एमटीएनएल, टाटा कम्युनिकेशन्स, सीबीआय मुख्यालय, अंबानी स्कूल, एफआयएफसी, बीकेसी फायर स्टेशन, एमएमआरडीए मैदान, टाटा पाॅवर, एशियन हॉर्ट हाॅस्पिटल, लक्ष्मी टाॅवर्स, चुनाभट्टी, धारावी डेपो, शीव रेल्वे स्थानक