मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी अटकेत असलेला मिहीर शहा (२३) आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांच्या बेकायदेशीर अटकेच्या दाव्यावर आठवडाभरात भूमिका स्पष्ट करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिले.

आपल्या आलिशान मोटरगाडीने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप मिहीर याच्यावर आहे. मात्र, आपल्याला अटकेची कारणे सांगण्यात आली नव्हती. त्यामुळे, आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा करून मिहीर याने त्याची तातडीने जामिनावर सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिडावत यानेही मिहीर याच्याप्रमाणेच बेकायदा अटकेचा दावा करून सुटकेची मागणी केली आहे.

हे ही वाचा… मुंबई : कर्नाक पुलासाठी मेगाब्लॉकची प्रतीक्षा, तुळई तयार असूनही पूल रखडणार

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे मिहीर आणि बिडावत या दोघांची याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, या दोघांनी याचिकेद्वारे केलेल्या दाव्यांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. तसेच, प्रकरणाची सुनावणी २९ ऑगस्ट रोजी ठेवली.

दरम्यान, अटकेची कारणे देण्यात आली नसल्याच्या कारणास्तव काही प्रकरणांत आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवण्यात आल्याच्या गेल्या काही महिन्यांतील निकालांचा मिहीर याने याचिकेत दाखला दिला आहे. तसेच, आपलीही अटक याच कारणास्तव बेकायदा ठरवून आपल्याला तातडीने जामिनावर सोडण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने आपल्याला सर्वप्रथम सुनावलेल्या पोलीस कोठडीचा आणि त्यानंतर देण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीचा आदेश रद्द करण्याची मागणीही मिहीरने केली आहे. त्याचप्रमाणे, आपली अटक बेकायदा असल्याने यापुढेही आपल्याला कोठडीत ठेवण्यात आल्यास ते घटनात्मक आदेशाचे तसेच, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ५० चे उल्लंघन ठरेल, असा दावा देखील मिहीर याने केला आहे. या कलमानुसार, पोलिसांनी आरोपीला अटकेची कारणे लेखी स्वरूपात सांगणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा… आयर्लंड वकिलातीमधील अधिकाऱ्याची सायबर फसवणूक, आरोपीला हरियाणातून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मिहीर याने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी गाडीचालक बिडावत हा मिहीरच्या बाजूला बसला होता. परंतु, अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. दुसरीकडे, घटनेबाबत कळल्यानंतर काही वेळाने राजेश शहा हे घटनास्थळी पोहोचले आणि गाडी मिहीर नाही, तर चालक चालवत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, असा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांच्यावरील आरोप हा जामीनपात्र असल्याचे नमूद करून कनिष्ठ न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.