मुंबई : रायगडचे सांस्कृतिक केंद्र आणि गणेशमूर्तीचे माहेरघरीच म्हणून अशी ख्याती असलेल्या पेण येथे दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत केला आहे. तब्बल पाच वर्षांनी हा थांबा दिल्याने, पेणकरांचा प्रवास सोयीस्कर होईल. यांसह दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला रोहा येथे थांबा देण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ५२ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात वाढ करण्यात आली आहे.
पेण येथे महत्त्वाची कार्यालये, शासकीय तंत्रनिकेतन, मोठी गणेशमूर्तींची बाजारपेठ, खोपोली आणि अलिबाग येथे जाण्यासाठी सुविधा आहेत. परंतु, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडी या रेल्वेगाडीचा पेण थांबा वगळून आपटा, जिते यासारख्या लहान स्थानकाला थांबे दिले होते. त्यामुळे रायगडमधील महत्त्वाच्या शहराला थांबा न दिल्याने, गेल्या पाच वर्षांपासून पेणला थांबा देण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर नुकताच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिवा-सावंतवाडी आणि सावंतवाडी-दिवा या दोन्ही रेल्वेगाड्यांना पेण येथे थांबा देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर रेल्वेने शून्य आधारित वेळापत्रकात तुतारी एक्स्प्रेसचा रोहा येथील थांबा रद्द केला होता. आता दादर-सावंतवाडी आणि सावंतवाडी – दादर तुतारी एक्स्प्रेसला रोहा येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे रायगडमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १४ रेल्वेगाड्यांचा प्रत्येकी एक थांबा वाढविला. यामधील इगतपुरी येथे थांबा घेणाऱ्या आठ रेल्वेगाड्या आहेत. तर, जौधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस, बंगळुरू-जौधपूर एक्स्प्रेसला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात आला आहे. तर, दादर-सावंतवाडी आणि सावंतवाडी – दादर तुतारी एक्स्प्रेसला रोहा येथे थांबा देण्यात आला आहे. तर, दिवा-सावंतवाडी आणि सावंतवाडी-दिवा या दोन्ही रेल्वेगाड्यांना पेण येथे थांबा देण्यात आला आहे.
इगतपुरी येथे आठ रेल्वेगाड्यांना थांबा
– सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेसला इगतपुरी येथे थांबा देण्यात आला आहे.
– सीएसएमटी-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि अमरावती-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेसला इगतपुरी येथे थांबा देण्यात आला आहे.
– दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी – दादर एक्स्प्रेसला इगतपुरी येथे थांबा देण्यात आला आहे.
– जबलपूर-सीएसएमटी गरीब रथ सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ सुपरफास्ट एक्स्प्रेसला इगतपुरी येथे थांबा देण्यात आला आहे.
राज्यातील ५२ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात केली वाढ आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ६ रेल्वेगाड्या, नागपूर विभागातील ४ रेल्वेगाड्या, पुणे विभागातील २२ रेल्वेगाड्या, सोलापूर विभागातील ६ रेल्वेगाड्या आणि मुंबई विभागातील १४ रेल्वेगाड्यांचा सहभाग आहे.