देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन करोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं. तसेच, स्वातंत्र्यदिनानंतर १६ ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी करोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

राज्यात करोना पुन्हा उसळू नये म्हणून…

आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयी भूमिका स्पष्ट केली. “गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. करोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो”, असं ते म्हणाले.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मर्यादा!

काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाउन पुन्हा लागू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेची माहिती दिली. “राज्यात १६ ऑगस्टपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, ऑक्सिजनची पातळी आणि वापर यांची मर्यादा महत्त्वाची ठरणार आहे. जर राज्यात तिसरी लाट आली आणि त्यामध्ये दिवसाचा आपला ऑक्सिजन वापर ७०० मेट्रिक टनाच्या वर गेला, तर राज्यात ऑटोमॅटिक मोडवर कठोर लॉकडाउन लागू केला जाईल”, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं होतं. त्यासंदर्भात आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे.