मुंबई: पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा असल्याचे सांगत या जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्षांकडून आज राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात आले. राज्याच्या विविध भागात निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्ष, माकप, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी व सामाजिक संघटनांनी भाग घेतला. जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, यावेळी शिवसेना आमदार महेश सावंत आमदार डॉ. ज्योती गायकवाड, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व्हेरायंटी चौक येथील गांधी पुतळ्याजवळ अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात इंडिया आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात बुलढाणा, जालना, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, पालघर, रत्नागिरी, धाराशिव, सोलापूर, लातूर, ठाणे, जळगाव, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे यासह राज्यभरातील सर्व जिल्हाच्या ठिकाणी आणि तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते, डावे पक्ष व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले.