मुंबई : तब्बल सतरा वर्षांनी देशात जनगणना होणार असून या जनगणनेच्या पूर्वचाचणीला चेंबूर, गोवंडीचा भाग असलेल्या एम पश्चिम विभागातून सुरूवात झाली. यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये जनगणना झाली होती.
दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा तब्बल सतरा वर्षांनी होणार आहे. जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी सुरू झाली आहे. पूर्वचाचणीमध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल.
जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी दिनांक १० ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येत आहे. पूर्वचाचणी अंतर्गत स्व-गणना करण्याचा पर्याय देखील दिनांक १ नोव्हेंबर, २०२५ ते ७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्यातील घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. पूर्वचाचणी करिता निवडलेल्या नमुना क्षेत्रांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम विभागातील चेंबूरचा भाग, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील या नमुना क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील.
एम पश्चिम विभाग अंतर्गत दिनांक १० नोव्हेंबर २०२५ पासून पूर्वचाचणीचे क्षेत्रीय काम सुरु झाले आहे. या कामकाजाचा आढावा घेणारी बैठक महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) श्रीमती सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे, उप महानिबंधक ए. एन. राजीव, महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी (शहर जनगणना अधिकारी) डॉ. दक्षा शहा आदी उपस्थित होते.
मुंबईची लोकसंख्या वाढणार ..
दरम्यान, २०१० मध्ये झालेल्या जनगणनेत मुंबईत १ कोटी २४ लाख इतकी लोकसंख्या होती. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच २०२० मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र करोना व टाळेबंदीमुळे जनगणना होऊ शकली नाही. ती आता होणार असून त्यामुळे आता किती लोकसंख्या आहे याची आकडेवारी या जनगणनेतून मिळू शकणार आहे.
निवडणूकीची प्रभाग रचना तयार करण्यासाठी जनगणना महत्त्वाची असते. मात्र २०१० नंतर जनगणना झालेली नसल्यामुळे तेव्हाचीच जनगणना अद्यापही ग्राह्य धरली जात आहे.
