मुंबई : उरण परिसरात अलीकडेच रानगव्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि काही प्रमाणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून रानगवा येथे वावरत असल्याचे सांगतिले जात आहे.

उरणमधील चिरनेर गावात अलिकडेच रानगव्याची हालचाल दिसून आली. तेथील शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चिरनेर परिसरात रानगव्याचे दर्शन ही महत्त्वाची बाब असून त्यापूर्वी या परिसरात रानगव्याची नोंद नाही. उरणमधील काही वन्यजीव अभ्यासकांनी सोनवारी या रानगव्याचे छायाचित्र टिपले आहे. शेताच्या बाजूला या रानगाव्याचे दर्शन झाले.

साधारण मार्च महिन्यापासून या परिसरात रानगवा दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. मात्र, त्यासंबंधी कोणतेही ठोस पुरावे मिळाले नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा रानगवा शेतात दिसल्याचे तेथील स्थानिक रहिवाशाने सांगितले. त्यानंतर तेथील स्थानिक अभ्यासकांनी घटनास्थळी भेट दिली असता तो रानगवा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पुरावे नसल्याने रानगव्याचे अस्तित्व मान्य करता येत नव्हते. सोमवारी पुन्हा एकदा रानगवा दिसल्याचे समजताच वन्यजीव अभ्यासकांनी त्याची छायाचित्रे टिपली आणि त्यावरुन चिरनेरमध्ये रानगवा वावरत असल्याचे सिद्ध झाले.

दरम्यान, चिरनेर परिसर हा पनवेल, कर्जत आणि कर्नाळा अभयारण्याच्या तुलनेत फार लांब नाही. हे सर्व क्षेत्र रानगव्यांसाठी नैसर्गिक अधिवास मानले जातात.गवे सहसा जंगलांमधून डोंगराच्या उतारावर किंवा पाणवठ्यांच्या दिशेने स्थलांतर करतात. रानगवा हा भारतातील सर्वात मोठा वन्यजीव असून त्याचे वजन १००० ते १५०० किलोग्रॅमपर्यंत असू शकतो. तो वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची१ अंतर्गत संरक्षित प्राणी आहे.

तळोजा एमआयडीसीमध्ये रानगवा

मे २०२३ मध्ये एक चार वर्षांचा नर रानगवा तळोजा एमआयडीसी परिसरातील पेंढार गावात आढळून आला होता. वनविभागाने त्याला सुरक्षितपणे पकडून नाशिक, ठाणे, पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील राखीव जंगलत सोडले. या गव्याने कर्जत, पनवेल आणि अंबरनाथ या तालुक्यांतून प्रवास केला होता.

यापूर्वीही नोंद

पनवेल आणि आसपासच्या भागांमध्ये रानगव्यांच्या उपस्थितीची यापूर्वीही नोंद झाली आहे. या घटना वन्यजीवांच्या अधिवसातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे घडत असल्याचे संकेत देतात. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने या बाबतीत सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मानव गवा संघर्ष वाढतोय

पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: पनवेल, भोर, पुणे आणि महाबळेश्वर या भागांत रानगव्यांच्या मानवी वस्त्यांजवळील उपस्थिती वाढली आहे. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या माहितीनुसार, गेल्या २.५ वर्षांत अशा १३ मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. वन्यजील तज्ज्ञांच्या मते जंगलांच्या आक्रसणामुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे हे प्राणी मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत.