मुंबई : मुंबईच्या समुद्रात आढळणाऱ्या जैवविविधतेला एक नवीन ओळख मिळाली आहे. भारतीय लायनफिश या विषारी पण आकर्षक समुद्री माशाची पहिल्यांदाच आयनॅचरलिस्ट या जागतिक जैवविविधता नोंदणी संकेतस्थळावर मुंबईतून नोंद झाली आहे. मरीन बायोलॉजिस्ट आणि निसर्गप्रेमी लिजू थॉमस यांनी काही दिवसांपूर्वी ही नोंद केली असून मुंबईच्या सागरी परिसंस्थेतील एका दुर्लक्षित पण महत्त्वाच्या घटकाची अधिकृत नोंद ठरली आहे.
सामान्यत: इंडियन लायनफिश म्हणून ओळखले जाणारे टेरोइस माईल्स हा स्कॉर्पेनिडे (स्कॉर्पियन फिश) कुटुंबातील एक विषारी समुद्री मासा आहे. दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील मूळ प्रजाती तिच्या लांब सुळसुळीत कल्ल्यांमुळे आणि अंगावर असलेल्या विषारी काट्यांमुळे ओळखली जाते. हा मासा सुंदर दिसत असला तरी तिचे काटे वेदनादायक असतात.
लायनफिशवर विशिष्ट तपकिरी रंगाचे पट्टे असतात. लायनफिश १ ते ३०० फूट खोलीपर्यंतच्या पाण्याच्या कठीण तळाशी, खारफुटी, समुद्री गवत, प्रवाळ आणि खडकांवर आढळतात. ही प्रजाती मंद गतीने चालणारी आहे. लायनफिश ५० पेक्षा जास्त प्रजातीचे मासे खातात ज्यात काही आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजातींचा समावेश आहे. लायफिशचे काटे विषारी असतात आणि यामुळे मृत्यूचा धोका देखील असतो. लायनफिश हे निशाचर असून दिवसा ते लपून बसतात. दरम्यान, मरिन बायोलॉजिस्ट लिजू थॉमस यांनी ही नोंद काही दिवसांपूर्वी केली आहे. दरम्यान, ही प्रजाती काही भागात आक्रमक प्रजाती म्हणून ओळखली जाते. लहान मासे आणि खेकडे हे त्यांचे भक्ष्य आहे.
स्थानिक जैवविविधतेकडे लक्ष देण्याची गरज
मुंबईच्या समुद्रात जैवविविधता भरपूर आहे फक्त तिला पाहणारी नजर आणि अभ्यासक हवेत. आयनॅचरलिस्ट, ई-बर्ड, इंडिया बायोडायर्व्हसिटी पोर्टल यांसारख्या मंचावर स्थानिक नोंदी वाढल्या तर मुंबईच्या सागरी पर्यावरणाचा अभ्यास आणि संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते असे मत मरीन लईफ ऑफ मुंबईचे प्रदीप पाताडे यांनी व्यक्त केले.