रस्त्याच्या कामांमधील त्रुटींच्या संदर्भात महापालिका आयुक्तांनी महापौरांना सादर केलेल्या अहवालानंतर अतिरिक्त आयुक्तांवरही कारवाई केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत एवढय़ा वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे या वेळी अशी कारवाई झाल्यास ते ऐतिहासिक ठरेल.
तत्कालिन रस्ता अभियंता आणि दक्षता विभाग अभियंता यांना तातडीने निलंबित करण्याची शिफारस रस्ते चौकशी अहवालात करण्यात आली आहे. याशिवाय दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, उपमुख्य अभियंता तसेच इतर कर्मचाऱ्यांवरील जबाबदारीही निश्चित करण्यात येत आहे. यांच्याच जोडीने प्रशासकीय व नियंत्रण अधिकाऱ्यावरही रस्ते घोटाळ्याची जबाबदारी देण्यासंदर्भात सूचित केले आहे.त्यामुळे रस्ते विभागाचे काम पाहणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांवरही कारवाई केली जाण्याची शक्यता पालिका वर्तूळात व्यक्त होत आहे. पालिकेतील अतिरिक्त आयुक्त हे आयएएस दर्जाचे असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्या संदर्भात चौकशी समिती नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते.