मुंबई : राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी ‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

राज्यात उद्योग उभारणीसाठी आणि गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या वेगवेगळय़ा परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले होते. त्यावरील चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी मागील दहा महिन्यांत राज्याने गुंतवणुकीत मोठी आघाडी घेतल्याचा दावा केला.

उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योग मंत्री म्हणून आपला समावेश असलेल्या समितीची बैठकीत निर्णय घेण्यात आला. देशात मानाचा व प्रतिष्ठेचा ठरेल असा हा पुरस्कार असेल, असे ते म्हणाले. उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकासाठी आणखी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र या सर्वच पुरस्कारांचे नेमके स्वरूप, ते कधी प्रदान करण्यात येणार आहेत, याबाबतचा तपशील त्यांनी सांगितला नाही.