लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई परिसरातील ५१ कबुतरखाने बंद करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आल्यानंतर आता ही कबुतरे लोकवस्तीतील इमारतींचा आधार घेतील, अशी भीती निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठी कबुतरांसाठी नागरी वस्त्यांबाहेर उद्याने उभारण्यात येतील, अशी माहिती उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबईत अनेक कबुतरखाने असून कबुतरांच्या विष्ठेमुळे विविध आजार पसरत असल्याचा अहवाल केईएम रुग्णालायकडून देण्यात आला. कबुतरांमुळे होणारे घातक रोग टाळण्यासाठी मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र अशा प्रकारे कबुतरखाने बंद केले, कबुतरांचे दाणा-पाणी बंद केले तर ते इमारती, वस्तींमध्ये शिरून त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे नागरी वस्तीबाहेर कबुतर उद्याने उभारण्यासाठी राज्य सरकार मुंबई महापालिकेत निर्देश देईल, अशी माहिती उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी महिनाभरात कबुतरखाने बंद झाल्यानंतर कबुतरे निवासी इमारतीत आश्रय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरी वस्तीच्या बाहेर कबुतरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून या पक्ष्याचे जतन करावे, अशी मागणी विधान परिषदेत केली. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी कबुतरांच्या उद्यानाबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.