मुंबई : कांजूरमार्ग येथे आढळलेल्या जखमी हरणाला रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) आणि वन विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून जीवदान दिले आहे. दरम्यान, सध्या हरणाला वैद्यकीय उपचारांकरिता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले आहे.

कांजूरमार्ग परिसरात रविवारी सायंकाळी जखमी हरीण आढळल्याची माहिती वनविभागाला मिळली होती. माहिती मिळताच वन विभाग आणि रेस्क्यूइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रॉचे सदस्य जोकिम नाईक, अमन सिंग, अजय कनोजिया, राहुल पांचाळ, अथर्व भोसले आणि रितिक जयस्वाल यांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणाची सुखरूप सुटका केली. दरम्यान, हरीण अन्नाच्या शोधात भरकटल्यामुळे या परिसरात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला झालेली जखम नेमकी कशामुळे झाली ते कळू शकलेले नाही.

हरणाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले आहे. काळजीपूर्वक आखलेल्या नियोजनामुळे आणि रॉ तसेच वनविभाग यांच्या समन्वयामुळे हरणाला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळाले. जखमी झाल्यामुळे तसेच धावपळ केल्यामुळे हरीण थोडे थकलेले होते.

परिसरात हरीण आले कसे ?

विहार तलाव व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पवईच्या जवळ आहेत. तिथे चितळ, सांबर ही हरणे मोठ्या प्रमाणात आढळतात. तेथे तलाव, नाले, गवताळ भाग असून राष्ट्रीय उद्यानातून बाहेर येऊन हरीण पाण्याच्या किंवा चाऱ्याच्या शोधात अशा भागात येतात. बांधकामे, रस्ते, नाले यामुळे प्राणी गोंधळतात आणि शहरी भागात शिरतात.

यापूर्वीही परिसरात नोंद

पवई, कांजूरमार्ग , चांदिवली, अंधेरी, बोरिवली, ठाणे या भागात याआधीही हरिण व अन्य वन्यप्राणी (चितळ, कोल्हा, बिबट्या) दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. पवईतील एका झोपडपट्टीतील घरात छपरावरुन हरिण पडल्याची घटना २०२० मध्ये घडली होती. जंगलात पळताना किंवा इतर वन्यप्राण्याने पाठलाग केल्यामुळे असे झाल्याचे सांगितले जाते. यावेळी वनविभाग आणि स्थानिक प्राणी संघटनेने त्याला जीवदान देऊन नंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द केले होते.