नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांची माहिती; ऐतिहासिक युद्धनौका अखेर निवृत्त

विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटचे तरंगते संग्रहालय करण्यासाठी केवळ आंध्र प्रदेश सरकारकडूनच प्रस्ताव आला आहे. पुढील चार ते पाच महिने आम्ही अन्य राज्यांच्या प्रस्तावाची वाट पाहू अन्यथा पुढील निर्णय घेण्यात येईल, असे भारतीय नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी स्पष्ट केले. आयएनएस विराटच्या मुंबईतील नौदलाच्या गोदीत पार पडलेल्या निवृत्ती समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.

सोमवारी सायंकाळी पश्चिम क्षितिजावर सूर्य बिंबाचा अस्त झाला आणि विराटवरील नौदलाचा ध्वज समारंभपूर्वक खाली घेण्यात आला व ५७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आयएनएस विराट निवृत्त झाली. या वेळी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागातील समस्त नौदल अधिकारी, लष्कराच्या गढवाल रेजिमेंटचे अधिकारी तसेच विराट यापूर्वी इंग्लंडच्या नौदलात सेवेत असल्याने तत्कालीन ‘रॉयल नेव्ही’चे प्रमुख व विराटवर काम केलेले ब्रिटिश नौसैनिक या भावपूर्ण सोहळ्याला उपस्थित होते.

आयएनएस विराटचे तरंगते संग्रहालय व्हावे ही भारतीय नौदलाची इच्छा आहे. मात्र, हे संग्रहालय उभारणे हे नौदलाचे काम नाही. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून निधीदेखील मिळणार नाही, असे अ‍ॅडमिरल लांबा यांनी स्पष्ट केले. म्हणून आम्ही देशातील किनारी राज्यांना विराटचे संग्रहालय उभारण्यासंदर्भात विचारणा करणारे पत्र पाठवले आहे. मात्र, याला फक्त आंध्र प्रदेशकडून सकारात्मक प्रस्ताव आला आहे. अन्य राज्यांनी याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे इथून पुढचे चार ते पाच महिने याबाबत अन्य कोणाचा प्रस्ताव येतो का याची वाट पाहण्यात येईल अन्यथा आयएनएस विराटबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. बजाज किंवा अन्य कंपन्यांकडून विराटला ताब्यात घेण्याबाबत कोणता प्रस्ताव आला आहे काय असे विचारले असता असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यानंतर विराटचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. आयएनएस विराटचे पाण्याच्या आतील संग्रहालय होणार का असे नौदल प्रमुखांना विचारले असता त्यांनी प्रस्तावाबददल अद्याप विचार केलेला नाही, आता प्रस्ताव आल्यास योग्य तो विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा इतिहास घडवणाऱ्या ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौकेला एका दिमाखदार सोहळ्यात निरोप देण्यात आला.
  • सायंकाळी ठीक ६ वाजल्यानंतर आयएनएस विराटवरील नौसैनिकांनी संचलन करत विराटवर फडकत असलेला नौदलाचा ध्वज खाली उतरवला. या वेळी नौदलाच्या वाद्य पथकाने वाजविलेली विशेष धून उपस्थितांना हेलावून गेली. हा ध्वज खाली उतरवत असताना नौदलाच्या चेतक हेलीकॉप्टरनी विराट भोवती हवेतून एक वर्तुळ पूर्ण करत मानवंदना दिली. ‘जलमेव यस्य बलमेव तस्य’ या आपल्या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत भारतीय नौदलातील ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या ‘सेंटॉर’ वर्गातील युद्धनौकेला कायमची विश्रांती देण्यात आली. तसेच, भारतीय नौदलात येण्यापूर्वी इंग्लंडच्या ‘रॉयल नेव्ही’मध्ये २७ वर्षे आपली विराटने सेवा बजावली होती.