अहमद पटेल यांच्या राज्यसभा सदसत्वासाठी परंपरा खंडित?
काँग्रेस पक्षात चार वेळा राज्यसभेसाठी संधी देण्याची अलिखित प्रथा परंपरा असली तरी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासाठी अपवाद केला जाणार आहे. काँग्रेस पक्षात बडय़ा नेत्यांना सारे माफ असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या राज्यसभेच्या खासदारकीकरिता नियमाचा अपवाद करण्यास मात्र पक्षातूनच विरोध होत आहे.
अहमद पटेल हे गुजरातमधून राज्यसभेवर लागोपाठ चार वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या खासदारकीची मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. काँग्रेसमध्ये राज्यसभेवर चार वेळाच संधी देण्याची परंपरा आहे. नजमा हेपतुल्ला, सुरेश पचौरी आदी नेत्यांना पक्षाने चार वेळाच संधी दिली. महाराष्ट्रातील सरोज खापर्डे या पाच वेळा राज्यसभेवर निवडून गेल्या असल्या तरी पहिल्यांदा त्यांना दोनच वर्षे संधी मिळाली होती. नंतर सतत चार वेळा त्यांना पक्षाने संधी दिली.
अहमद पटेल हे तीन वेळा लोकसभेवर निवडून आले असून, १९९३ पासून गेली २४ वर्षे सतत राज्यसभेचे खासदार आहेत. गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीत पुन्हा उमेदवार मिळावी, असा अहमद पटेल यांची इच्छा आहे. निर्णय प्रक्रियेत राहुल गांधी यांचे महत्त्व वाढल्याने अहमदभाईंना पुन्हा संधी मिळेल का, अशी चर्चा सुरू झाली. सोनियांचे विश्वासू सहकारी असल्याने अहमद पटेल यांच्यासाठी अपवाद करण्यात येणार आहे. त्यांना लागोपाठ पाचव्यांदा राज्यसभेकरिता उमेदवारी दिली जाणार असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
येचुरींना पक्षातूनच विरोध
अहमद पटेल यांच्यासाठी हा अपवाद करण्यात येणार असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासाठी नियमाला बगल देण्यास पक्षातूनच विरोध होत आहे. माकपत लागोपाठ दोनदाच राज्यसभेसाठी संधी दिली जाते. ही प्रथा परंपरा मोडण्यास डाव्या पक्षातील बुजुर्गाचा विरोध आहे. पक्षात पश्चिम बंगाल विरुद्ध केरळ, असा वाद असतो. येचुरी हे पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले असून, त्यांची मुदतही पुढील महिन्यात संपत आहे. केरळमधील नेत्यांनी येचुरी यांच्याकरिता नियमाचा अपवाद करण्यास विरोध दर्शविला आहे.