मुंबई : आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टच्या तिजोरीत भर पडली असून प्रेक्षकांतील लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्याचे काम बेस्ट उपक्रमाच्या ५०० बसद्वारे केले जात आहे. त्यातून बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. देशभरात २२ मार्चपासून आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. त्यातील काही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही रंगत आहेत.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारली. तर, गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगलोर सामना रंगला. वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लहान मुले येतात. शैक्षणिक संस्थेच्या या मुलांना वानखेडे स्टेडियममध्ये आणण्याची जबाबदारी बेस्टने घेतली आहे. तब्बल १८ हजार मुलांना आणण्यासाठी बेस्टच्या ५०० बस आरक्षित केल्या होत्या. त्यात वातानुकुलित, विनावातानुकूलित, दुमजली बसचा समावेश आहे.

हेही वाचा…येस बँकेचं ४०० कोटींचं फसवणूक प्रकरण : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक

एका बससाठी किमी अंतर आणि बस उभी करण्याचा कालावधी मोजून साधारणपणे १२ ते १८ हजार रुपये आरक्षण रक्कम भरावी लागते. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांचा महसूल मिळतो. दर सामन्याला ६० ते ८० लाख रुपयांचा महसूल मिळत असल्याने, आयपीएलच्या सत्रात बेस्टला ४ ते ५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, तसेच वानखेडे स्टेडियमवर मुलांना नेण्याचे काम गेल्या १४ वर्षांपासून सुरू आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा…मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश

वानखेडे स्टेडियमवरील पुढील सामने

वानखेडे स्टेडियमवर १४ एप्रिल रोजी मुंबई वि. चेन्नई, ३ मे रोजी मुंबई वि. कोलकत्ता, ६ मे रोजी मुंबई वि. हैदराबाद आणि ७ मे रोजी मुंबई वि. लखनऊ असे क्रिकेट सामने होणार आहे.