दीनानाथ परब

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल असे विधान केले आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे आता शिवसेना-भाजपा महायुती एकत्र येईल आणि सरकार स्थापनेचा तिढा सुटेल असे अनेकांना वाटू शकते. पण सुधीर मुनगंटीवार यांचे विधान नीट समजून घेतले तर त्यात अप्रत्यक्षपणे शिवसेनेला अल्टीमेटम दिसून येतो.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस होत आले तरी महाराष्ट्रात अजून सत्ता स्थापनेच्या हालचाली दिसत नाही. मुख्यमंत्रीपद आणि अन्य महत्वाच्या खात्यांवर शिवसेना-भाजपा अडून बसले आहेत. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि महत्वाच्या खात्यांवर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच अजून सुटू शकलेला नाही. शिवसेना-भाजपा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला असला तरी दुसऱ्याबाजूला शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत असे ते म्हणाले.

महायुती म्हणून दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली मग इतके दिवस सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला नाही का? हा प्रश्न यातून निर्माण होतो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन करु असेही मुनगंटीवार म्हणाले. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी शिवसेनेची अडीजवर्षाची मुख्यमंत्रीपदाची मागणी फेटाळून लावली.

आम्ही आता उद्यापासून जनहिताच्या कामाला सुरुवात करणार आहोत असे देखील मुनगंटीवार म्हणाले. म्हणजे भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार? २०१४ प्रमाणेच भाजपा स्थापन करणार का? हा प्रश्न निर्माण होतो. २०१४ साली भाजपाकडे पूर्ण बहुमत नव्हते. पण राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिला होता. आता सुद्धा तशीच रणनिती आखून भाजपा सरकार बनवणार का? असे प्रश्न मुनगंटीवार यांच्या विधानामधून निर्माण होत आहेत.