मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २८ लाख ५५ हजार ७०९ नागरिकांवर राज्यात उपचार सुरु आहेत. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार उपलब्ध आहेत. १४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात येणार असून विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
भारतात मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत असून आगामी काळात भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनेल असा इशारा जागातिक आरोग्य संघटनेने दिला आहे. आजघडीला भारतात दहा कोटीपेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण असून प्रिडायबिटीक रुग्णांची संख्या सुमारे १३ कोटी एवढी असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर मधुमेहाविषयी व्यपक जनजागृतीची आवश्यकता असून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. राज्यात व्यापक जगजागृती मोहीम राबविण्यात येत असून मोठ्या प्रमाणात मधुमेह निदानासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मध्यंतरी मधुमेह व रक्तदाब चाचणी मोहीम राबविली त्याचप्रमाणे निदान झालेल्या रुग्णांना घरपोच औषध देण्याची मोहीमही राबवली होती.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मधुमेह परिणाम करू शकतो. म्हणूनच, प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिबंध, तपासणी व उपचार यांची आवश्यकता असते. बाल्यावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत मधुमेह प्रतिबंध, तपासणी आणि उपचार यावर भर देण्यात आला आहे. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि वेळेवर तपासणी हे मधुमेह नियंत्रणाचे मुख्य घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मधुमेह हा बालपण, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय आणि वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो, त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने राज्यभर आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा, व्याख्याने आणि आरोग्य परिषदा आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांना मधुमेहाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मधुमेह ही आयुष्यभराची जबाबदारी असून एकत्रितपणे त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. अलीकडच्या काळात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात मधुमेह असल्याचे आढलून आले असून यामागे वाढते ताणतणाव, झोपेचा अभाव तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास तसेच नियमित चालण्यासह व्यायम केल्यास मदुमेह निश्चितपणे आटोक्यात आणता येऊ शकतो. तसेच मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्ती तो लांब ठेवू शकतात असेही डॉक्टरांनी सांगितले.
