मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरासाठी ४२ हजार १३५ रुपये इतके वार्षिक सेवा शुल्क आकारले आहे. सेवा शुल्क परवडणारे नसल्यामुळे ते कमी करावी, अशी मागणी विजेत्या गिरणी कामगारांकडून वारंवार करण्यात येत आहे. या मागणीसाठी गिरणी कामगार, वारसदारांनी मंगळवारी म्हाडा भवनावर मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेतली. दरम्यान, यासंदर्भात म्हाडा, गिरणी कामगार, गिरणी कामगार संघटना यांची १८ मार्च रोजी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई मंडळाने २०१६ मध्ये कोनमधील २४१७ घरांसाठी सोडत काढली आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली. दरम्यान ८०० हून अधिक गिरणी कामगारांनी घरांची रक्कम याआधीच भरली असून अनेकांचे गृहकर्जाचे मासिक हप्ते सुरू झाले आहेत. हप्ते सुरू होऊनही घराचा ताबा मिळत नसल्याने अनेक विजेते चिंतेत होते. आता मंडळाने घराचा ताबा देण्यास सुरुवात केली, पण विजेत्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढवल्या आहेत. कोनमधील घरांसाठी मंडळाने ४२ हजार १३५ याप्रमाणे वार्षिक सेवा शुल्क आकारले आहे. महिन्याला सुमारे ३ हजार ५११ रुपये सेवा शुल्क आकारण्यात आले आहे. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. मुंबईतील गोरेगावच्या घरासाठी १७ हजार रुपये इतके वार्षिक सेवा शुल्क असताना पनवेलमधील साडेसहा लाखांच्या घरासाठी भरमसाठ सेवा शुल्क का आकारले, असा प्रश्न यानिमित्ताने गिरणी कामगार संघटना आणि विजेत्यांनी उपस्थितीत केला आहे. सेवा शुल्क कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: दोन कोटींच्या चरससह एकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजता गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली म्हाडाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी म्हाडाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गिरणी कामगारांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्याची भेट घेतली. सेवा शुल्क माफ करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. मुख्य अधिकाऱ्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत १८ मार्च रोजी म्हाडा आणि गिरणी कामगारांची एक संयुक्त बैठक बोलावली आहे.