जूनचा निम्मा महिना उलटल्यानंतरही मुंबईत मे महिन्याप्रमाणे उकाड्याचा अनुभव येत आहे. हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी तो फोल ठरत आहे. दरम्यान, जून महिन्यातही मुंबईतील नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मुंबईतील जून महिन्यात सरासरी तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके असते. मात्र, यंदा जून महिन्यात आत्तापर्यंतचे तापमान सरासरी ३३ ते ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
हेही वाचा >>> Central Railway Mega Block: मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मुंबईत शुक्रवारी कुलाबा येथे ३४.६, तर सांताक्रुझ येथे ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशानी अधिक आहे. आद्रतेतही चढ – उतार होत आहेत. मुंबईत मागील काही दिवसांपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, उन्हाचा कडाका कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत तापमानात बदल होणार नाहीत. त्यानंतर २ ते ३ अंशानी तापमान उतरेल. पुढील आठवड्यात मुंबईतील कमाल तापमान २९ ते ३० अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
यंदा हवामान विभागाने मार्चमध्ये सहा दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला होता. एप्रिलमध्ये दोन दिवस आणि मेमध्ये कोकणात एक दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला होता. तसेच जून महिन्यात विदर्भात सर्वाधिक उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला होता.
हेही वाचा >>> फेरीवाल्यांविरोधातील कारवाईसाठी तोकडे मनुष्यबळ; मुंबई महानगरपालिका कंत्राटदाराकडून मनुष्यबळा घेणार
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली, मात्र मुंबईत मोसमी पाऊस अद्याप दाखल झालेला नाही. मुंबईमधील पवई, बोरिवली, मुलुंड, तसेच ठाणे, नवी मुंबईतील काही भागात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. मात्र मुंबईच्या उर्वरित भागात कडक उन्हामुळे मुंबईकर बेजार झाले होते. दरम्यान, शनिवार, रविवारी पावसाच्या मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शुक्रवारी विदर्भात मोसमी वारे दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र मुंबईत अद्याप पाऊस दाखल झालेला नाही. दरम्यान, २४ किंवा २५ जून रोजी मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.