मुंबई : पाच दिवसांच्या गणपतींना भाविकांनी रविवारी निरोप दिल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात सोमवारी गौरीगणपतीला निरोप देण्यात आला. यंदा करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसह विसर्जनस्थळी वाजतगाजत गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या गेल्या. विसर्जनस्थळी जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
गणेशोत्सवानिमित्त गेले सहा दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी पाच दिवसांच्या गणेशाला भाविकांनी निरोप दिल्यानंतर सोमवारी गौरीगणपतीला निरोप देण्यात आला. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, ठिकठिकाणचे नैसर्गिक आणि मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विसर्जनस्थळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर फटाक्यांची आतशबाजी करत भाविक ढोल-ताशाचा तालावर थिरकत होते.
’ सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत २२,१६४ घरगुती, ८५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे, तर ३,८०६ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
’ कृत्रिम तलावांत ८,७७० घरगुती, तर ३४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे, तसेच १,३५० गौरींचे विसर्जन करण्यात आले.