मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह अनेक जिल्ह्यांत गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला होता. त्याप्रमाणे दुपारपासून पावसाने मुंबईला झोडपून काढले. यामुळे बेस्ट बस सेवा विस्कळीत झाली. तर, मध्य रेल्वेवरील कल्याण, बदलापूर-अंबरनाथ येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने अनेक लोकल एकाच ठिकाणी एक ते दीड तास अडकल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले.
हवामान विभागाचा धोक्याचा इशारा असल्याने मुंबईकरांनी मनाची तयारी करून गुरुवारी सकाळी प्रवासाला सुरुवात केली. मात्र, सकाळी रिमझिम पाऊसधारा सुरू असल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. दुपारपासून अचानकपणे पावसाचा जोर वाढल्याने मुंबईची तुंबई होण्यास सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला.
दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कल्याण स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. या घटनेने कल्याण, कर्जत, कसारा आणि सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा कोलमडली. मध्य रेल्वेकडून २० ते २५ मिनिटे उशिराने लोकल सेवा धावत असल्याचे सांगितले जात होते, प्रत्यक्षात लोकल तासभर एकाच ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे लोकलमधील महिला, दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
पालिका-रेल्वे यांच्यात आरोप-प्रत्यारोप..
दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने चर्चगेटमधील काही भागांत पाणी साचले होते. तर, दुपारी १ वाजेच्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्स दरम्यान रेल्वे रुळावर काही प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे काही मिनिटांनी लोकल सेवा उशिराने धावत होती. रेल्वे रुळावर पाणी साचण्याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाने थेट मुंबई महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या बांधकामातून निघालेल्या राडारोडय़ामुळे (डेब्रीज) पाणी तुंबले. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे काम सुरू असल्याने, मरिन लाइन्स परिसरातील सर्व पातमुख कमी कार्यक्षमतेने काम करत होते. अनेक पातमुखे ओसंडून वाहत होती. त्यामुळेच रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचा थेट आरोप पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिकेवर केला. मुंबईची तुंबई झाल्यावर पालिका आणि रेल्वे यांचा वाद चव्हाटय़ावर आला असून दोघांकडून आरोप-प्रत्यारोप, आरोपांचे खंडन करणे सुरू झाले आहे.
पर्यायी मार्गाने बेस्ट बस सेवा..
बेस्ट बस सेवा मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली होती. पाणी साचल्याने नियमित मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने बस धावत होत्या.
तसेच सायंकाळी अनेक बस स्थानकांवर लांबच्या लांब रांगा
लागल्या होत्या. बोरिवलीमध्ये रस्त्यावर पाणी भरल्याने बेस्ट
बस मार्ग क्रमांक ४६२, २४५, २४०, २८१, ४६० या बसचे मार्ग वळवले.