मुंबई : कांजूर मार्ग घनकचरा प्रकल्पाबाबत सातत्याने येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून ६० दिवसांच्या चौकशी केली जाईल. तसेच या प्रकल्पाचे तृतीय पक्ष लेखापरीक्षणही करण्यात येईल असे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. भाजपचे मिहिर कोटेचा यांनी सदर लक्षवेधी सूचना मांडली होती.

२०११ मध्ये ‘मेसर्स अँथनी लारा एन्व्हायरो सोल्यूशन कंपनी’ला २०११ मध्ये २५ वर्षांसाठी कांजूरमार्ग क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ‘बायोरिएक्टर तंत्राज्ञान’ आधारीत प्रक्रियेचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र कंत्राटातील अटीप्रमाणे कंपनी दुर्गंधीचे व्यवस्थापन करत नाही, अशा नागरिकांकडून तक्रारी आहेत.

या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल. या समितीमध्ये संबंधित विभागांच्या वर्ग- १ अधिकाऱ्यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील दैनंदिन सहा हजार मेट्रीक टन कचरा या ११८ हेक्टर क्षेपणभूमीवर आणला जातो. या कचऱ्यावर अटींप्रमाणे मातीचा थर व सुंगंधी द्रव्य फवारले जात नाही. परिणामी परिसरातील १६ लाख रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. कंत्राटदार सीज्यु अँथनीने बृहन्मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना गप्प केलेल आहे. या कंपनीस पालिकेकडून नोटीसा दिल्या जात नाहीत.

कचरा चारचार दिवस उचलला जात नाही. कंत्राटदाराच्या गाड्या मोडकळीस आलेल्या आहेत. या कंत्राटाच्या नुतनीकरणाचा पालिकेत घाट घातला जात आहे. या कचरा कंत्राटामध्ये पालिकेच्या जुन्या कारभाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे आरोप चर्चेदरम्यान सदस्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या लक्षवेधीवरील चर्चेत सुनील राऊत, रईस शेख, अमीन पटेल, अस्लम शेख, मुरजी पटेल, अतुल भातखळकर या सदस्यांनी भाग घेतला.