मुंबई : विविध कारणांमुळे मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून आता भांडूपमध्ये वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारी खिंडीपाडा मनपा मराठी शाळा आता बंद झाली आहे. नुकतेच कायमस्वरूपी शिक्षकांअभावी पासपोली मराठी शाळा क्र. २ बंद पडल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता भांडूपमधील आणखी शाळा बंद झाल्याने अनेकांकडून खंत व्यक्त केली जात आहे. अशातच महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शाळेचा अंत झाल्याचा आरोप करत आमदार संजय उपाध्याय यांनी शाळेची पुनर्बांधणी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
न्यू माहीम शाळेचे प्रकरण चर्चेत असतानाच भांडूपमधील पासपोली मराठी शाळा क्र. २ शिक्षकांअभावी बंद पडली आहे. अशातच खिंडीपाडा मनपा मराठी शाळा बंद पडल्याचे समोर आल्याने शिक्षक, पालकांकडून त्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
खिंडीपाडा शाळेचा इतिहास
महानगरपालिकेच्या एस विभागातील खिंडीपाडा मनपा मराठी शाळा ही जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेत बांधण्यात आली होती. सन १९७१ पासून सुरू असलेली ही शाळा संबंधित परिसरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात मोठा आधार ठरत होती. पण अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती न झाल्याने तिची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही शाळेची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती न झाल्याने अखेर शाळा बंद पडली.
या प्रकरणी राज्य शिक्षक परिषदेने आमदार संजय उपाध्याय यांना पत्र पाठवले. त्यांनतर, संबंधित शाळेची पुनर्बांधणी तातडीने पूर्ण करून शाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार संजय उपाध्याय यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून खिंडीपाडा परिसरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करण्याचीही विनंती केली आहे. शाळा जीर्णवस्थेत असताना महापालिकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
खिंडीपाडा मनपा शाळा जीर्ण झाल्यामुळे २०२४ मध्ये वर्षभर विद्यार्थी संत निरंकारी सत्संग सभागृहात बसत होते. परंतु शाळेचे ठिकाण शाळेपासून उंच डोंगरावर असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड पायपीट करत शाळा गाठावी लागत असे. सातत्याने प्रयत्न करूनही महानगरपालिकेने त्यानंतरही या समस्येकडे लक्ष दिले नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शाळा धोकादायक घोषित झाल्यानंतर ही शाळा मूळ ठिकाणापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तूळशेत पाडा या शाळेत स्थलांतरित करण्यात आली. शाळेत बालवाडीसह ८० विद्यार्थी अध्ययन करत होते. मात्र, एवढ्या दूर पाठवण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिक्षणासाठी पाठवले. परिणामी, विद्यार्थीच नसल्याने खिंडीपाडा मनपा मराठी शाळा बंद झाली.
पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?
केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या शाळेचा शेवट झाला आहे. खिंडीपाडा परिसरातील गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यासाठी खिंडीपाडा मनपा मराठी शाळेचे नव्याने बांधकाम करावे, तसेच, शाळा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली आहे.