सध्या तरी पुरावे नसल्याचा पोलिसांचा दावा

मुंबई : आयएनएस ‘विक्रांत’ वाचविण्यासाठी जमा केलेल्या निधीच्या अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना उच्च न्यायालयाने बुधवारी अटकेपासून कायमस्वरूपी दिलासा दिला. सोमय्या यांना अटक झाल्यास त्यांची जामिनावर तत्काळ सुटका करण्याचेही न्यायालयाने त्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका निकाली काढताना स्पष्ट केले.

आयएनएस ‘विक्रांत’साठी सोमय्या यांनी कुठे आणि कसा निधी जमा केला याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यावर सोमय्या यांच्याविरोधात सध्या पुरावे नाहीत. परंतु चौकशी सुरूच राहील. त्यामुळे सध्या त्यांच्या कोठडीची आवश्यकता नाही. मात्र त्यांना अटक करायची झाल्यास त्याआधी ७२ तासांची नोटीस दिली जाईल, असे पोलिसांतर्फे बुधवारी न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने पोलिसांचे म्हणणे नोंदवून घेऊन सोमय्या यांची याचिका निकाली काढली. तसेच सोमय्या यांना अटकेपासून कायमस्वरूपी दिलासा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयएनएस ‘विक्रांत’साठी निधी जमा करून त्याचा अपहार केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने सोमय्या पिता-पुत्राने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यावर दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्यावर बोट ठेवत सोमय्या यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. हा दिलासा वेळोवेळी वाढवण्यात आला होता.