भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका दिला,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली त्या कंपनीला मुलाने ठेका दिला, असाही आरोप केला. ते बुधवारी (१ मार्च) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “आता नंबर कुणाचा, सुजित पाटकर की संजय राऊत? १०० कोटी रुपयांचा कोविड घोटाळा बाहेर आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केलं. कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार सापडले. काही आयकर विभाग, काही ईडीने, तर काही काही मुंबई पोलिसांनी शोधले. संजय राऊत यांचे भागिदार सुजित पाटकर यांच्या ‘लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस’ या कंपनीला महापालिकेकडून एकूण ३२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी १४ कोटी ३ लाख २९ हजार ८३९ रुपये एका वेगळ्याच बँक खात्यात पाठवण्यात आले.”

“एका मेव्हुण्याच्या खात्यात लाखो रुपये पाठवले गेले”

“या बँक खात्यातून कोणाकोणाला पैसे गेले हा तपास सुरू आहे. आयकर खातं यावर तपास करत आहे. आयकर विभाग, ईडी आणि मुंबई पोलीस यावर तपास करत आहेत. एका मेव्हुण्याच्या खात्यात लाखो रुपये पाठवले गेले. हा मेव्हुणा काही दिवसांनी कळेल. या प्रकरणी ज्यांना अटक झाली त्यात केईम रुग्णालयाबाहेरचा चहावाला आहे. त्याच्यावर मे २०२२ मध्ये मी धाड घातली होती,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“”एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका”

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका देण्यात आला. आदित्य ठाकरेंनी तर पुण्यात पीएमआरडीएने बंदी घातलेल्या या कंपनीला वरळीतील आयसीयू ठेका दिला. पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात तीन कोविड रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे या कंपनीवर बंदी घालण्यात आली.”

हेही वाचा : VIDEO: कोल्हापुरात दाखल होताच किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप, म्हणाले, “५०० कोटी…”

“बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली, त्या कंपनीला मुलाने ठेका दिला”

“यानंतर बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली, त्या कंपनीला मुलाने वरळी कोविड सेंटरच्या आयसीयूचा ठेका दिला. याशिवाय दहिसर आयसीयूचा ठेकाही याच कंपनीला दिला,” असं म्हणत सोमय्यांनी ठाकरे पिता-पुत्रावर सडकून टीका केली.