मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीमधील रुणवाल समूहाच्या प्रकल्पातील ६२१, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाण्यातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील, तसेच १० मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत शिल्लक घरांचा दिवाळीतील सोडतीत समावेश असणार आहे. 

नवीन सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून कोकण मंडळाची ४ हजार ६५४ घरांची सोडत काढण्यात येत आहे. मात्र अनेक इच्छुक वेळेत आवश्यक कागदपत्रे जमा न करू शकल्याने ते या सोडतीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळेच या सोडतीसाठी खूपच कमी अर्ज सादर झाले आहेत. मात्र ज्यांना अर्ज करता आला नाही किंवा मुंबई महानगर प्रदेशात हक्काचे घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी कोकण मंडळाने येत्या दिवाळीत सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताला मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दुजोरा दिला.

 मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीजवळील कल्याण तालुक्यातील घारीवली आणि उसरगाव परिसरातील रुणवाल समूहाच्या प्रकल्पातील ६२१ घरे मंडळाला उपलब्ध होणार आहेत, तर वसई-विरार, ठाणे आणि नवी मुंबईतील २० टक्के योजनेतील आणखी काही नवीन घरेही उपलब्ध होणार आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातील मंडळाच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरेही पूर्ण होणार आहेत. १० मेच्या सोडतीत शिल्लक राहणाऱ्या घरांचा समावेश दिवाळीदरम्यान काढण्यात येणाऱ्या सोडतीत करण्यात येणार आहे. 

डोंबिवलीतील घरे अत्यल्प आणि अल्प गटासाठी ..

डोंबिवलीजवळील कल्याण तालुक्यातील घारीवली आणि उसरगाव परिसरातील रुणवाल समूहाच्या प्रकल्पातील ६२१ घरे अत्यल्प तसेच अल्प गटातील आहेत. या घरांचे क्षेत्रफळ २७ ते ४३ चौरस मीटर अर्थात २९० ते ४६२ चौरस फूट आहे. या घरांच्या किमती लवकरच निश्चित करण्यात येणार असून बाजारभावाच्या तुलनेत किती तरी पटीने ही घरे स्वस्त असतील, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे.