मुंबई : कोकणातून जाणारी रेल्वे अद्याप भारतीय रेल्वेत विलीन करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळण्यास अडचणी येतात. निधीची कमतरता भासते. त्याविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती आक्रमक झाली आहे. सध्या कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारने कोकण रेल्वेच्या स्थानकाबाहेरील परिसराचे नूतनीकरण केले असून स्थानकांतील अंतर्गत परिसर भकास आहे. भारतीय रेल्वेतील स्थानकांसाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्यात येत आहे. त्यात कोकणातील फक्त दोनच स्थानके म्हणजे उडुपी आणि मडगावचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र महाराष्ट्रातील कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा त्यात समावेश नाही. तसेच अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यापैकी कोकण रेल्वेसाठी फक्त १,५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रवासी सुविधा वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत.

संपूर्ण देशातील रेल्वेचे दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण केले जात आहे. मात्र कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच, अनेक स्थानकांचे टर्मिनसमध्ये रूपांतर करणे व इतर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयी दूर होण्यासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी २३ कोकण रेल्वे प्रवासी संघटना एकवटल्या आहेत. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याला सर्व राजकीय पक्षांचे नेते सहमत आहेत. त्यात भाजप नेते नारायण राणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत, शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचा समावेश आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.

हेही वाचा – मुंबई : पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक

हेही वाचा – मुंबई : पावसाने दडी मारताच उन्हाच्या झळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाड्या उशिरा धावणे, जादा रेल्वेगाड्या नसणे, मर्यादित स्थानकांना थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणे अशा समस्या कोकणी प्रवाशांना भेडसावतात. कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मार्गिकेचे दुहेरीकरण आणि नवीन स्थानकाची बांधणी करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती आणि नवीन स्थानकांमुळे त्या पट्ट्यातील गावांचा विकासही होईल. तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होण्यासाठी २३ कोकण रेल्वे प्रवासी संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणासाठी पाठपुरावा करण्यात येईल. – अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती