मुंबई : कोकण रेल्वेवर मागील २६ वर्षांपासून मालवाहतूकीच्या क्षेत्रात वेगवान मार्ग तयार करणारी ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ (रो-रो) सेवा सुरू आहे. या सेवेद्वारे देशभरात जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. आता रो-रो सेवेच्या वॅगनची वहनक्षमता ५० टनावरून ५७ टन करण्यात आली आहे. त्यामुळे ५७ टनापर्यंत ट्रकची वाहतूक करणे शक्य झाले आहे.
धान्य, फळे, भाजीपाला, दैनंदिन जीवनात आवश्यक विविध गोष्टी, अत्यावश्यक सेवेतील सामग्रीची वाहतूक रो-रो सेवेद्वारे केली जाते. वातावरणातील प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी, माल वाहतुकीचा जलद व्हावी यादृष्टीने कोकण रेल्वेची रो-रो सेवा कार्यरत आहे. परंतु, रो-रो सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वॅगनची क्षमता ५० टन होती. परिणामी, ५० टनांपेक्षा अधिक वजनाचे सामान असलेल्या ट्रकची वाहतूक करता येत नव्हती.
मालवाहतूक कार्यक्षमता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेने रो-रो वॅगनची वहन क्षमता ५० टनांवरून ५७ टनपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. यामुळे अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक अधिक सुलभ होईल. वाढलेल्या क्षमतेमुळे कोकण रेल्वेवरून लोह आणि पोलाद, संगमरवरी टाइल्स, बांधकाम साहित्य आणि इतर जड मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना आणि उद्योगांना विशेषतः फायदा होईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे देण्यात आली.
