वीज पुरेशी उपलब्ध असल्याने कोयना धरणात उपलब्ध असलेले मुबलक पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी व शेतीसाठी अधिकाधिक वापरावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे सातारा व सांगली जिल्ह्यासह मिरजेपर्यंतच्या पट्टय़ातील गावांना लाभ होणार आहे. मात्र जलसंपदा विभागाने अजून वीजनिर्मितीच्या कोटय़ातील पाणी अन्य वापरासाठी वळविले नसले तरी त्याचा वापर विजेसाठी काटकसरीनेच सुरू आहे.
कोयना धरणात सध्या सुमारे ३७ टीएमसी पाणी उपलब्ध असून त्यातील राज्याच्या कोटय़ाचे पाणी २७ टीएमसी इतके आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याने वीजनिर्मितीसाठी १५ टीएमसी पाणी कमी दिले जाणार आहे. तरीही १२-१३ टीएमसी इतके पाणी वीजनिर्मितीसाठी देता येऊ शकते. वीजेची मागणी सध्या दिवसा १५ हजार २०० मेगावॉट तर रात्री १६ हजार ५०० मेगावॉटच्या घरात आहे. दुष्काळ व उन्हाळ्यामुळे कृषी क्षेत्राची मागणी घटली असून उद्योगांनाही पाणीटंचाईचा फटका बसल्याने वीजेची मागणी तुलनेने कमी आहे. त्यामुळे पुरेशी वीज उपलब्ध असून काही संच वीजेच्या मागणीअभावी बंद करण्याची वेळ महानिर्मिती कंपनीवर गेल्या दोनतीन आठवडय़ात आली आहे. त्यामुळे कोयनेच्या पाण्यावर होणारी वीजनिर्मितीही खूप कमी करण्यात आली असून साधारणपणे ३०० ते ५०० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती पाच ते सात तास करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2016 रोजी प्रकाशित
कोयनेचे पाणी शेती व पिण्यासाठी देण्याची मागणी
कोयना धरणात सध्या सुमारे ३७ टीएमसी पाणी उपलब्ध असून त्यातील राज्याच्या कोटय़ाचे पाणी २७ टीएमसी इतके आहे.
Written by उमाकांत देशपांडे

First published on: 20-04-2016 at 05:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyna dam water demand for agriculture and drinking instead of power generation