मुंबई : ‘मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का, असा सवाल करीत अशा प्रकारे भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल, तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का, असाही प्रश्न राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी मराठी – हिंदी वादावर भूमिका मांडली व आपला अनुभव सांगितला. महाराष्ट्रात मराठी बोलले नाही तर मार खावा लागेल, हे सद्यस्थितीत मी वर्तमानपत्रात वाचत आहे. अशाच प्रकारचा वाद तामिळनाडूतही झाला होता तेव्हा मी खासदार होतो. रस्त्याने जाताना जमाव बघून रात्री ९ वाजता मी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. मला बघून जमाव पांगला. मात्र ज्यांना जमावाकडून मार खावा लागला ते लोक तिथेच होते. त्यांच्याकडून झाल्या प्रकाराची माहिती घेतली असता ती माणसे हिंदीत बोलू लागली.

मला हिंदी येत नसल्याने ते काय बोलताहेत हे कळत नव्हते. तेव्हा एका माणसाने तामीळ येत नसल्याने त्यांना मारल्याचे सांगितले. त्यांच्याकडे तामीळ बोलण्याचा आग्रह केला जात होता, ते येत नाही म्हणून बाकीचे लोक त्यांना मारत होते. त्यानुसार आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? या प्रसंगात ज्यांना मारहाण झाली त्यांची मी माफी मागितली. त्यांना जेवू घातल्याचे राज्यपालांनी सांगितले.

गुंतवणूकदार येतील का?

अशा प्रकारे भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल, तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला वेदना देत आहोत. भाषा ही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही. मला हिंदी येत नाही ही बाब अडचणीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील अनेकांना वर काढले आहे. त्यातील ५ टक्के लोकांनाच हिंदी भाषा बोलता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याला अनेक भाषा शिकता आल्या पाहिजेत, पण त्याचवेळी आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये. माझ्यासाठी माझी मातृभाषा महत्त्वाची आहे. तशीच ती प्रत्येक मराठी माणसासाठीही आहे. आपण भाषेच्या मुद्यावर सहिष्णु वृत्ती बाळगली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले