लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. श्रद्धा कपूर, डॉ. एन. राजम, सचिन पिळगावकर, सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णीसह दिग्गजांना सन्मानित करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८३ वा स्मृतिदिन मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात २४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान हा मंगेशकर कुटुंबियांनी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सांभाळलेला सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट असून या ट्रस्टद्वारे दरवर्षी विविध क्षेत्रातील दिग्गजांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२२ मध्ये सुरू केलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे.

मंगेशकर कुटुंबियांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा केली. यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभावी योगदानाबद्दल श्रद्धा कपूरला, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना, हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी अभिनेते सुनील शेट्टी यांना, तसेच भारतीय संगीताच्या क्षेत्रात उदयास येणाऱ्या रीवा राठोडला सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांच्यासह शास्त्रीय संगीतक्षेत्रातील दोन प्रतिष्ठित महिलांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

दिग्गज व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या वक्तृत्वपूर्ण आणि चिरस्थायी साहित्यिक योगदानासाठी वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन’ संस्थेला सन्मानित केले जाणार आहे. त्याचसोबत स्क्रिप्टिस क्रिएशन आणि रंगाई प्रॉडक्शन यांच्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समर्पण, उत्कृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्त रूप दिलेल्या व्यक्तींचा दरवर्षी सन्मान केला जातो. हा पुरस्कार सोहळा म्हणजे केवळ भूतकाळाचे स्मरण नसून वर्तमान आणि भविष्याला दिलेली एक ऊर्जा आहे’, असे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले. तसेच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेनुसार ‘सारं काही अभिजात’ या आत्म्याला भिडणाऱ्या संगीतमय श्रद्धांजलीने पुरस्कार सोहळ्याचा समारोप होईल. यावेळी विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार यांच्यासह अनेक कलाकार कला सादर करणार आहेत. त्याचसोबत विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या अनोख्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.