लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राज्यातील २६४ संस्थांना नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी इरादा पत्र देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) विद्यापीठाला सर्वाधिक ८२ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कायम विनाअनुदानित तत्वावर महाविद्यालये सुरू करण्याबाबत हे इरादापत्र मंजूर करण्यात आले आहे.

शासनाकडून नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी देण्यात येणारे इरादा पत्र ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वैध असणार आहे. इरादा पत्र मिळाल्यानंतर संबंधित संस्थेला शासनाच्या विहित अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक असेल. या अटी व शर्तींची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल अंतिम मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह विद्यापीठास सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाल्याशिवाय विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयांना संलग्नता देता येणार नाही. तसेच महाविद्यालयांना कोणत्याही परिस्थितीत इरादापत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीत, या नियमाचे उल्लंघन केल्यास यासंदर्भातील कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर इरादापत्रही रद्द करण्यात येईल.

आणखी वाचा-भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेचे अभियान

मुंबई विद्यापीठाचे परिक्षेत्र हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांत असून सध्या एकूण ८७२ महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहेत. आता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मुंबई विद्यापीठास १४ नवीन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी मुंबईत चेंबूर आणि दहिसर येथे प्रत्येकी १ यानुसार एकूण २, ठाणे जिल्ह्यात ६, पालघर जिल्ह्यात ३, रायगड जिल्ह्यात २ आणि रत्नागिरी जिल्ह्यात १ महाविद्यालय आहे. या विविध महाविद्यालयांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखा, लेखा आणि वित्त, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, डाटा विज्ञान, आदरातिथ्य अभ्यास, संगणक शास्त्र हे अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आणखी वाचा-माहीम कोळीवाड्यातील पहिल्या ‘सी फूड प्लाझा’ला मुंबईकरांची पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विद्यापीठांना महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता

मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाला बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, जालना, परभणी आदी विविध जिल्ह्यांत सर्वाधिक ८२ महाविद्यालये, त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास ५९, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास २९, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास २०, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास १६, मुंबई विद्यापीठास १४, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास १३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ११, कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठास १०, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास ५ आणि गोंडवाना विद्यापीठास ५ अशी एकूण २६४ नवीन महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने इरादा पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक शाखांसह विधि, लेखा आणि वित्त, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, डाटा विज्ञान, आदरातिथ्य अभ्यास, पत्रकारिता आदी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम नवीन महाविद्यालयात सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.